
सेवानिवृत्त शिक्षिकेची दोन लाख रुपयांची फसवणुक
पुणे, ता. 12 ः मोबाईल कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रातुन बोलत असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका सेवानिवृत्त शिक्षिकेची दोन लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी 69 वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना एक डिसेंबर रोजी घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या वारजे माळवाडी परिसरात राहतात. एक डिसेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने "आपण एसएन कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहोत'', अशी बतावणी करुन त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. "तुमचे मोबाईल सीमकार्ड बंद न होण्यासाठी 10 रूपये शुल्क भरावे लागेल.'' असे सांगून त्यांना एक ऍप डाऊनलोड करण्यास सांगून त्यावर माहिती भरण्यास भाग पाडले. त्यानंतर ऍपमध्ये डेबिट कार्डद्वारे दहा रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादींनीही त्याच्यावर विश्वास ठेवून दहा रुपये भरले. त्यानंतर सायबर चोरट्याने फिर्यादींच्या बॅंक खात्याचा ताबा स्वतःकडे घेऊन त्यांच्या बॅंक खात्यातील दोन लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग करुन घेतली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ सायबर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक डी. जी. बागवे करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62938 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..