'ससून रुग्णालया'च्या शवागारातील मृतदेह कुजण्याची भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sasoon Hospital Pune
'ससून रुग्णालया'च्या शवागारातील मृतदेह कुजण्याची भीती

'ससून रुग्णालया'च्या शवागारातील मृतदेह कुजण्याची भीती

पुणे - भर उन्हाळ्यात ससून रुग्णालयाच्या (Sasoon Hospital) शवागारातील (Mortuary) वातानुकूलित यंत्रणा (AC System) मरणासन्न झाली आहे. तेथे मृतदेह (Deathbody) योग्य तापमानात ठेवले जात नाहीत. त्यामुळे मृतदेहांचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याची माहिती पुढे आली आहे.

ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे नवीन इमारतीमध्ये स्थलांतर होणार आहे. त्यामुळे तेथील शवागाराच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. विभागाच्या स्थलांतरासाठी किमान एक महिना लागेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या शवागारातील तापमान योग्य पद्धतीने राखले न गेल्यास मृतदेह कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.

स्थलांतराच्या नावाखाली दुर्लक्ष

राज्यात सर्वाधिक शवविच्छेदन ‘ससून’मधील शवागारात होतात. दरवर्षी होणाऱ्या शवविच्छेदनांची संख्या आता सात हजारांवर गेली आहे. देशातील सर्वाधिक शवविच्छेदन होणाऱ्या केंद्रांपैकी हे एक प्रमुख केंद्र आहे. शवागाराचे नवीन इमारतीत स्थलांतर होणार असल्याचे कारण पुढे करत दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जबाबदार कोण?

न्यासवैद्यकशास्त्र विभागाचे म्हणणे

शवागारातील किमान तापमान राखले जात नसल्याच्या तक्रारी न्यायवैद्यकशास्त्र विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केल्याची माहिती देण्यात आली. पण या तक्रारींना ससून रुग्णालयातील विद्युत विभागाने प्रतिसाद दिला नाही. नवीन इमारतीत स्थलांतर होणार आहे, हेच कारण विद्युत विभागाकडून वारंवार पुढे केले जात आहे.

विद्युत विभागाचे म्हणणे

शवागाराच्या वातानुकूतील यंत्रणेबाबत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून एकही लेखी तक्रार नाही किंवा दूरध्वनीवरूनही याबद्दल कोणी माहिती दिली नाही. आज याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर तातडीने यंत्रणा तपासणी हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकाराला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

‘ससून’मधील मृतदेहाला प्राधान्य

ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह शवागारात ठेवण्यास प्राधान्य दिले जाते. त्यानंतर शवागारात जागा असेल, तरच इतर रुग्णालयातील मृतदेह ठेवले जातात, असेही शवागार विभागातर्फे सांगण्यात आले.

रात्रभर मृतदेह रुग्णवाहिकेत!

रुग्णालयात उपचार सुरू असताना एका नातेवाइकांचा रात्री आठ वाजता मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी दुसऱ्या दिवशी सकाळी करायचा ठरले. संबंधित रुग्णालयात शवागार नव्हते आणि रात्रभर मृतदेह ठेऊन घेण्यास ते रुग्णालय तयार होईना. अखेर ससून रुग्णालयाच्या शवागाराचे दरवाजे रात्री बारा वाजता ठोठावले. तेथील कर्मचाऱ्यांना हाका मारल्या. मात्र, काही केल्या दरवाजा उघडला नाही. एक तास प्रयत्न करून रुग्णवाहिका घराकडे वळवली. पूर्ण रात्र मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला आणि दुसऱ्या दिवशी नातेबाइकाचा अंत्यविधी केल्याचे सांगताना रवींद्र गायकवाड यांचे अश्रु अनावर झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62986 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top