
प्रवासी सव्वालाख; सीसीटीव्ही अवघे ६१ पुणे रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
पुणे, ता. १३ : पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. यात कोणत्याही प्रकारच्या स्फोटकांची दारू अथवा जिलेटिन कांड्या आढळून आल्या नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, या निमित्ताने पुन्हा एकदा पुणे स्थानकावरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेत कोणताही घातपात झाला नाही. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजना फोल असल्याचे स्पष्ट झाले. स्थानकांवर सर्व बाजूंनी प्रवेश खुला आहे. तसेच या ठिकाणी गर्दुल्ल्यांचाही मुक्त वावर आहे. प्रवाशांना तपासणारी कोणतीही यंत्रणा नाही. तसेच या ठिकाणी असणारी सीसीटीव्हींची तोकडी संख्याही प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. त्यामुळे आतातरी रेल्वे प्रशासनाने या सर्व गोष्टींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.
देशातील व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या पुणे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. रोज सुमारे २५० रेल्वे स्थानकातून ये-जा करतात. यातून सव्वा लाख प्रवाशांची वाहतूक होते. असे असले तरीही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. जीआरपी व आरपीएफ मिळून स्थानकावर २० ते २२ कर्मचारी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात अवघे ५ ते १० आरपीएफ येथे दिसतात. शिवाय पुणे स्थानकावर अवघे ६१ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. ते देखील कालबाह्य झालेले आहे. या ठिकाणी घडणाऱ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आणखी किमान १०० सीसीटीव्हीची कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे. तसा प्रस्तावदेखील आरपीएफने दिला आहे. मात्र त्यास अद्याप परवानगी मिळाली नाही.
स्थानकातील शॉर्टकट बंद करणे गरजेचे
पुणे स्थानकावर येणारे शॉर्टकट बंद होणे गरजेचे आहे. यात डीआरएम कार्यालयाच्या बाजूच्या रस्त्यावरून काही जण भिंत ओलांडून थेट स्थानकात प्रवास करतात. तसेच काहीजण पार्सल ऑफिस, रनिंग रूम यांच्या बाजूनेदेखील फलाटावर थेट प्रवेश करतात. त्यामुळे स्थानकातील अनधिकृत प्रवेश रोखणे गरजेचे आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत फलाटावरची आरपीएफची संख्या आम्ही वाढवीत आहोत. आरपीएफ व जीआरपी मिळून सुमारे १५ ते २० कर्मचारी फलाटावर उपस्थित असतात. ती वाढवून आता ३५ इतकी केली जाईल. सीसीटीव्ही वाढविण्याचादेखील प्रस्ताव दिला आहे.
- उदय पवार, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, पुणे
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63084 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..