मिरची स्प्रे मारून लूट केलेला चोरटा गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरची स्प्रे मारून लूट केलेला चोरटा गजाआड
मिरची स्प्रे मारून लूट केलेला चोरटा गजाआड

मिरची स्प्रे मारून लूट केलेला चोरटा गजाआड

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः रस्त्याच्याकडेला थांबलेल्या दांपत्याच्या डोळ्यांवर मिरची स्प्रे मारुन महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रकार नुकताच घडला होता. गुन्हे शाखेच्या युनिट पाचमधील पथकाने या घटनेतील चोरट्याचा शोध घेऊन त्यास बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले.

कुणाल गणपत जगताप (वय २१, रा. खराडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा भाऊ अभिषेक जगताप याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी परिसरातील बी. टी. कवडे रस्त्यावर एक दांपत्य दोन दिवसांपूर्वी सायंकाळी थांबले होते. त्यावेळी दुचाकीस्वार कुणाल जगताप व त्याचा भाऊ अभिषेक तेथे आले. त्यांनी दांपत्याच्या डोळ्यावर मिरची स्प्रे मारला. त्यानंतर त्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून दोघेजण पसार झाले. याप्रकरणी दाम्पत्याने चंदननगर पोलिसात फिर्याद दिली. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाकडून या प्रकरणाचा समांतर तपास केला जात होता. त्यावेळी दाम्पत्याला लुटणारा चोरटा हडपसर भागातील सराफ बाजारात सोन्याच्या वस्तु विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्यास पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने कबुली दिली. जगताप हा चाकणमधील एका सराफी पेढीत कामाला होता. सराफी पेढीत सुरक्षेसाठी मिरची स्प्रे ठेवतात. चोरट्यांना रोखण्यासाठी या स्प्रेचा वापर केला जातो. जगतापने सराफी पेढीतून स्प्रे चोरुन हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांना दिली. यापूर्वीही मिरची स्प्रेचा वापर करून चोरट्यांनी लुटीच्या घटना केल्या आहेत. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, रमेश साबळे, दया शेगर, अश्रृबा मोराळे, महेश वाघमारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63165 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top