
लस न घेतलेल्या कर्मचाऱ्याला सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय मागे
पुणे, ता. १३ : कोविड प्रतिबंधक लशीचे डोस न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांना विनावेतन सुट्टीवर पाठविण्याचा निर्णय पुण्यातील सिम्बॉयसिस सोसायटीने अखेर मागे घेतला आहे. तसेच या कारणांमुळे कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत रुजू करण्यात येईल, अशी हमीदेखील दिली आहे. जोपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीचे दोन्ही डोस कर्मचारी घेत नाहीत, तोपर्यंत अशा कर्मचाऱ्यांनी विनावेतन रजेवर जावे, असे ई-मेल सिम्बॉयसिसच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना धाडले होते.
सिम्बॉयसिसच्या या निर्णयानुसार सुब्रता मुजुमदार यांना व्यवस्थापनाने विनावेतन सुट्टीवर जाण्यासाठी सांगितले होते. या कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात याविरोधात याचिका केली होती. न्या. अनिल मेनन आणि नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने याची दखल घेऊन खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (ता. १३) व्यवस्थापनाच्या वतीने संबंधित लसीकरण धोरण मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने याची नोंद घेतली. तसेच याचिकादाराचा जानेवारीपासून रखडवलेला पगार देण्याचे आदेशही खंडपीठाने व्यवस्थापनाला दिले. सिम्बॉयसिस सेंटर फोर इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणारे मुजुमदार यांनी लस ऐच्छिक असून सरकारने तिची सक्ती केली नाही, त्यामुळे हा निर्णय बेकायदेशीर आहे, असे याचिकेत म्हटले आहे. प्रकृतीच्या कारणांमुळे मी लस घेऊ शकत नाही, असे देखील यामध्ये स्पष्ट केले आहे. विद्यापीठाच्या मनुष्यबळ विभागाकडून कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेचा दुसरा ई-मेल आल्यानंतर आणि विनावेतन काम बंद केल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63241 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..