
रिंगरोडसाठी सर्व्हेनंबरनिहाय्य यादी जाहीर
पुणे, ता. १३ : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या पश्चिम रिंगरोडसाठी एका बाजूला भूसंपादनासाठीचे दर निश्चित करण्याचे काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला भूसंपादनाच्या प्रक्रियेलासुद्धा वेग आला आहे. त्यानुसार रिंगरोडसाठी हवेली तालुक्यातील कोणत्या गावातील किती जमीन भूसंपादन करावी लागणार आहे. याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून सर्व्हेनंबरनिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पश्चिम रिंगरोड हा भोर, हवेली, मुळशी आणि मावळ या तालुक्यातून जाणार आहे. या रिंगरोडची लांबी ६८ किलोमीटर इतकी आहे. तर ९१० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. या रिंगरोडच्या मोजणीचे काम पूर्णत्वास आले. भोर तालुक्यातील एका गावाचे मोजणी काम बाकी आहे.
मोजणीचे काम पूर्ण झालेल्या गावातील रिंगरोडचे नकाशे भूमी अभिलेख विभागाकडून एमएसआरडीसीकडे देण्यात आले आहे. यासह मोजणीवेळी शेतात कोणती पिके आहेत, कोणती झाडे, त्यांची संख्या, शेतात विहीर, बोअरवेल, घर, आदी माहिती नकाशांवर घेण्यात आली आहे. तसेच हद्दी व खुणासुद्धा दर्शविण्यात आल्या आहेत. शेतात असलेली झाडे, घरे, विहीर, बोअरवेल आदी माहितींच्या आधारे शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम निश्चित केली जात आहे. त्यामुळे रिंगरोड बाधितांच्या दृष्टीने ही माहिती महत्त्वाची आहे.
हवेली तालुक्यातील भगतवाडी, बहुली, सांगरुण, मांडवी बुद्रुक, वरदाडे, खामगाव मावळ, मोरदरवाडी, कल्याण, रहाटावडे या नऊ गावातील सुमारे ७८१ सर्व्हेनंबरमधून रिंगरोड जात आहे, याची माहिती प्रसिद्ध केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63264 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..