
निम्म्याहून अधिक प्रभागांच्या रचनेत बदल
पुणे, ता. १३ ः पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना अखेर शुक्रवारी (ता. १३) रात्री निवडणूक आयोगाने जाहीर केली. प्रारूप प्रभाग रचनेमध्ये तब्बल ५५ टक्के बदल करण्यात आला आहे. एकूण ५८ प्रभागांपैकी ३२ प्रभागांत लोकसंख्येनुसार सीमा बदलण्यात आल्या आहेत, तर २६ प्रभागांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम यांची समिती गठित केली होती.या समितीने एकूण ९७ बदल सुचविले होते. त्यापैकी ५० बदल हे आयोगाने पहिल्याच बैठकीत रद्द केले. उर्वरित ४७ पैकी १५ ते १६ प्रभागाच्या हद्दीत मोठे बदल केले आहेत. हे बदल प्रामुख्याने कोथरूड, शिवाजीनगर, हडपसर, खडकवासला तर काही प्रमाणात कसबा विधानसभा मतदारसंघात केल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. प्रभाग क्रमांक १३ सूस म्हाळुंगे हा प्रभाग मात्र दोन सदस्यांचा ठेवण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य निवडणुकांची निवडणूक प्रक्रिया दोन आठवड्यांत सुरू करा असे आदेश दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. गुरुवारी (ता. १२) अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयुक्तांकडे स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आली होती, त्यानंतर १७ मे पर्यंत प्रभाग रचनेची अधिसूचना काढण्यास मुदत आहे, मात्र लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री ११ वाजता अंतिम प्रभाग रचना व त्यांचे नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले.
आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष
अंतिम प्रभाग रचना जाहीर केली असली तरी तीनच्या प्रभागात ५० टक्के महिला आरक्षण असणार आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व जमातीसाठीचे आरक्षीत प्रभाग कोणते, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. त्यामुळे इच्छुकांचे लक्ष आता आरक्षणाच्या सोडतीकडे लागले आहे. सोडतीनंतर आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यावर अनेक इच्छुकांपैकी ते स्वतः लढणार की पत्नीला रिंगणात उतरविणार, हे देखील स्पष्ट होणार आहे. तसेच महापौर पदासाठीच्या आरक्षणाच्या सोडतीचीही प्रतिक्षा आहे.
येरवडा सर्वांत मोठा प्रभाग
अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक ९ येरवडा हा प्रभाग सर्वात मोठा प्रभाग ठरला आहे. या प्रभागाची लोकसंख्या ७१ हजार ३९० इतकी आहे. प्रारूप रचनेतही एवढीच लोकसंख्या दाखविण्यात आली होती. सर्वात लहान प्रभाग बहुचर्चित प्रभाग क्रमांक १३ सूस म्हाळुंगे बाणेर हा ठरला आहे. या प्रभागाची लोकसंख्या ३१ हजार ८६९ इतकी आहे. प्रारूप रचनेत येथे ३७ हजार ५८९ लोकसंख्या होती.
असे झाले बदल...
- पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ ८ प्रभागांत बदल तर पुण्यात ३२ प्रभागांत बदल
- प्रभाग क्रमांक २६ वानवडी गावठाण वैदूवाडीमध्ये ८ हजार ७०१ लोकसंख्या कमी झाली
- सर्वात कमी बदल प्रभाग ५७ सुखसागर नगरमध्ये ३२८ ने लोकसंख्या कमी झाली
- प्रभाग क्रमांक ४१ कोंढवा मिठानगरमध्ये तब्बल १० हजार ३२५ लोकसंख्या वाढली
- एकूण ७ प्रभागांमधील लोकसंख्या ५ हजारापेक्षा कमी किंवा जास्त झाली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63309 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..