
उपनगरांवर प्रभाग रचनेत विशेष लक्ष
पुणे,ता. १४ : महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या नव्या प्रभाग रचनेत सदस्य संख्या १७३ झाली. त्यापैकी १०० हून अधिक सदस्य उपनगरांमधून येणार आहेत. त्यामुळे रचनेत या प्रभागांवर महाविकास आघाडीने विशेष लक्ष दिले आहे, असे दिसते. या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याचे सांगितले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत या उपनगरांचा झपाट्याने झालेला विकास आणि स्थानिकांपेक्षा परराज्यातून आणि परगावातून आलेल्या नागरीकांची वाढलेली संख्या याचा फायदा २०१७ च्या निवडणुकीत भाजपला झाला.
राष्ट्रवादी-भाजपप्रमाणेच शिवसेनेला मानणारा वर्गही या प्रभागांमध्ये आहे. त्या तुलनेत काँग्रेसचे अस्तित्व क्षीण आहे. भाजप वगळता कोणत्याही एका पक्षाची १७३ जागा स्वबळावर लढविण्याची तयारी सध्या नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही आघाडी होणार का, यावर पुढील राजकीय गणिते ठरतील. सध्यातरी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आघाडीबाबत एकमत असले, तरी काँग्रेसमध्ये मतभेद आहेत.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून महापालिका निवडणुकांकडे पाहिले जात आहे. प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षानी तातडीने ३४ गावांचा दौरा करून तयारीला सुरूवातदेखील केली. महाविकास आघाडीने प्रभाग रचना अंतिम करताना या प्रभागांची विशेष काळजी घेतली. नव्या रचनेत ३२ प्रभागांमध्ये बदल आहेत. हे बदल विशेषतः भाजपचा बालेकिल्ला असलेल्या प्रभागांमध्ये आहेत. लोकसंख्येनसुार दोन ते तीन हजाराने बदल झाला असला, तरी प्रत्यक्षात प्रभागातील मतदानावर तीस ते चाळीस टक्के परिणाम होऊ शकतो. सोसायट्यांना वस्ती आणि झोपडपट्ट्या जोडताना शिवसेना आणि काँग्रेसलाही फारसा फायदा होणार नाही, याची काळजी घेतली असल्याचे दिसून येते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63519 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..