
अभयारण्यांत प्राणी गणनेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
पुणे, ता. १५ ः बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी राज्यातील अभयारण्यांमध्ये प्राण्यांची गणना करण्यात येते. यामध्ये वन विभागातील कर्मचाऱ्यांसह प्राणी मित्रही अत्यंत कुतूहलाने सहभाग घेतात. पण, ही गणना नेमकी कशी आणि का होते?, याबद्दल अनेकांना कुतूहल असते. ही गणना सामान्यतः प्राण्यांच्या ठशांवरून केली जाते. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या प्रक्रियेत विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. याचा आढावा घेण्यासाठी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने वन विभागाकडून घेतलेली माहिती.
याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी (पौड) संतोष चव्हाण यांनी सांगितले की, ‘‘प्राणी गणना आजही प्राण्यांच्या ठशांवरून केली जाते. असे असले तरी याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. प्राण्यांच्या गणनेसाठी जीपीएसचा वापर वाढला आहे. सध्या प्राणी गणनेसाठी जुन्या पद्धतीची कागदी प्रपत्र न भरता मोबाईल ॲपवरती प्रपत्र भरून पाठवली जातात.’’
याच दिवशी प्राणी गणना का ?
बुद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्याच्या दिवसातील सर्वाधिक प्रकाशमान रात्र असते. खरंतर वैशाख महिन्यातील उन्हाच्या तीव्र झळांमुळे पाणवठ्यावर प्राणी येतात. त्यामुळे त्यांची गणना करण्यासाठी ही अत्यंत उत्तम संधी ठरते. यासाठी वन विभागातील कर्मचारी दुपारपासूनच यासाठी तयारी करतात. यामध्ये प्राणी मित्रांनाही सहभाग घेता येतो.
प्राणी गणनेसाठीचे प्रकार
१. ट्रान्झिट लाइन सेन्सेस ः या प्रकारामध्ये दोन ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत एक सलग रेष आखून प्रत्येक ४०० मीटरवर केंद्र बिंदू आखले जातात. या सर्व बिंदूंवर पहाटे-पहाटे फिरून निरीक्षणे नोंदविण्यात येतात. यामध्ये वनस्पतींचे प्रकार, प्राण्यांच्या पायाचे ठसे, विष्ठा आदींची निरीक्षणे यांचा समावेश असतो. या सर्व घटकांचा अभ्यास करत त्या क्षेत्रात असणाऱ्या वन्यप्राण्यांची संख्या, प्रकार यांचा अंदाज दिला जातो.
२. पाणवठ्यावरील प्राणी गणना ः या प्रकारामध्ये वन्यप्राणी जिथे पाणी पिण्यासाठी येतात, असे पाणवठे निवडले जातात. दरवर्षी बुद्ध पौर्णिमाच्या रात्री ही गणना केली जाते. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाश ठळक असल्यामुळे पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्यप्राण्यांची हालचाल टिपता येते. तसेच कोणते प्राणी पाणी पिण्यासाठी आले, त्यांची एकूण नोंद ठेवता येते. पाणवढ्यावरील गणनेमध्ये पाणी पिण्यासाठी आलेल्या सर्व वन्यप्राण्यांची नोंद करून त्यावरून एक ढोबळ अंदाज करता येतो.
३. कॅमेरा ट्रॅप ः प्राणी गणनेमध्ये ‘कॅमेरा ट्रॅप’ हा एक भरवशाचा आणि खरेखुरे चित्र समोर ठेवणारा प्रकार आहे. यामध्ये
रात्रीच्या वेळी काम करणारे सेन्सर असणारे (नाइट व्हीजन सेन्सर) कॅमेरे विविध भागात बसवले जातात. कॅमेरा समोरून प्राणी गेल्यास हे सेन्सर कार्यरत होतात व त्या प्राण्याचे छायाचित्र टिपतात. या सर्व छायाचित्रांची पाहणी तज्ज्ञांमार्फत केली जाते. कॅमेरा ट्रॅप शक्यतो वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानामध्ये जास्त वापर केला जातो.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63520 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..