केतकी चितळेविरुद्ध पुण्यातही गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केतकी चितळेविरुद्ध पुण्यातही गुन्हा दाखल
केतकी चितळेविरुद्ध पुण्यातही गुन्हा दाखल

केतकी चितळेविरुद्ध पुण्यातही गुन्हा दाखल

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर ट्विट, पोस्ट करणे अभिनेत्री केतकी चितळे हिला चांगलेच महागात पडले. तिच्यासह दोघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दरम्यान, पवार यांच्याविषयी ट्विटरवरही आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या नाशिक येथील तरुणाविरुद्धही सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

केतकी चितळे व ॲड. नितीन भावे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर नाशिक येथील निखिल भामरे याच्याविरुद्ध दुसरा गुन्हा सायबर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. केतकीने संतांच्या अभंगाचा आधार घेत पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर (पोस्ट) लिहिला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रारअर्ज देऊन चितळे, ॲड. भावे व भामरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ॲड. विकास शिंदे यांनीही या प्रकरणी तक्रारअर्ज दिला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, पवार यांच्यावर नाशिक येथील तरुणाने आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्याच्याविरुद्धही सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. निखिल भामरे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने ‘बागलाणकर’ या नावाच्या ट्विटर अकाउंटवरून पवार यांच्यावर वादग्रस्त व धमकीवजा ट्विट केले होते. त्याचा स्क्रीनशॉट शेअर करून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करीत मुंबई, ठाणे व पुणे पोलिसांना टॅग केले होते. नाशिक पोलिसांनी भामरे यास ताब्यात घेतले. तर पुणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, अशी माहिती सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांनी दिली.

मारहाणीप्रकरणी तक्रार
भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी शरद पवार यांच्यावर दोन दिवसांपूर्वी टीका केली होती. दरम्यान, शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २० ते २५ जणांनी त्यांच्या सरस्वती मंदिर येथील कार्यालयात जाऊन धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. आंबेकर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या फडगेट पोलिस चौकीत या बाबत तक्रार दाखल केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63608 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top