
टोमॅटो फ्लूचे रुग्ण राज्याच्या सीमेवर
पुणे, ता. १५ : कोरोना साथरोगाचा उद्रेक आता कुठे कमी होत असताना केरळ आणि त्याच्या शेजारच्या कर्नाटक राज्यात टोमॅटो फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. हा आजार लहान मुलांना होत असल्याने पालकांची काळजी वाढली आहे.
केरळमधील कोवलम परिसरात टोमॅटो फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. हा संसर्गजन्य रोग असल्याने एकापासून दुसऱ्याला याचा वेगाने प्रसार होत असल्याचे निरीक्षण आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्यातही संसर्ग होणाऱ्यांमध्ये लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसते.
काय आहे हा आजार?
टोमॅटो फ्लू हा विषाणूजन्य आजार आहे. डेंगी आणि चिकुनगुणियाप्रमाणे असणाऱ्या या आजार किटकांमुळे पसरतो. याच्या संसर्गामुळे रुग्णाच्या त्वचेवर टोमॅटोच्या आकारातील लाल रंगाचे लहान-लहान पुरळ येतात. त्यामुळे त्याला टोमॅटो फ्लू असे नाव देण्यात आले आहे.
लक्षणे
- पुरळ येणे
- ताप
- त्वचेची जळजळ
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे
- सांधेदुखी
- मळमळ, उलट्या
जगभरात विषाणूंचे वेगवेगळे वर्गीकरण केले आहे. उदाहरणार्थ, ऑर्थोमायक्सोव्हिरिडे आणि कोरोनाविरिडे ही विषाणूंची वेगवेगळी कुटुंबे आहेत. स्वाइन फ्लू हा ऑर्थोमायक्सोव्हिरिडे कुटुंबातील एक इन्फ्लूएंझा विषाणू आहे. तर, ‘सार्स कोव्डिड -२’ हा कोरोनाविरिडे कुटुंबातील एक कोरोना विषाणू आहे. सध्या चर्चेत आलेल्या टोमॅटो विषाणूंचा तपशिल अद्याप पुढे आलेला नाही. त्याचा प्रसार ऑथ्रोपॉड्सच्या माध्यमातून पसरतो की नाही, याची माहिती समोर आल्यानंतर त्यावर नेमकेपणाने भाष्य करता येईल. त्याचा धोका आहे का, हे सांगता येईल. मूलतः हा विषाणू फ्लूचा आहे का, याची सर्वप्रथम खात्री करावी लागेल.
- डॉ. राजेश कार्यकर्ते, विभाग प्रमुख, सूक्ष्मजिवशास्त्र विभाग, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय
देशातील टोमॅटो फ्लूबाबात ‘राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्र’बरोबर (एनसीडीसी) चर्चा झाली आहे. मात्र, या बाबतच्या कोणत्याही सूचना अद्याप आलेल्या नाहीत. लहान मुलांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, त्याचे नेमकेपणाने निदान अजून झालेले नाही. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी घाबरण्याची परिस्थिती नाही.
- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्व्हेक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63780 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..