‘फिटनेस’च्या ओव्हरडोसमुळे आरोग्याला धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gym-Exercise
‘फिटनेस’च्या ओव्हरडोसमुळे आरोग्याला धोका

‘फिटनेस’च्या ओव्हरडोसमुळे आरोग्याला धोका

पुणे - अगं काय गं, इतकी लठ्ठ कशी झाली... तुझं वजन फारच कमी झालं आहे... त्या अभिनेत्री किंवा अभिनेत्यासारखी बॉडी हवी... अशा विविध कारणांमुळे खरंतर फिटनेसला तरुणाई प्राधान्य देत आहे. त्यात कोरोनानंतर आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सतत वर्कआउट, व्यायाम करणे आता नवीन राहिले नाही. हे करत असताना सोशल मीडियावर वर्कआउटचे फोटो टाकत लाइक्स मिळविण्याचा खटाटोप सुरू होतो. फिटनेससाठी प्रत्येकाने व्यायाम करावे; पण त्यामुळे शारीरिक क्षमतांकडे दुर्लक्ष करत व्यायामाचा ओव्हरडोस हा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असे जिमचालक, फिटनेस ट्रेनर आणि डॉक्‍टरांनी सांगितले.

फिटनेस राखण्यासाठी व्यायाम हा गरजेचा आहेच, पण तो कसा, किती आणि कोणता हे देखील समजून घेणे महत्त्वाचे आहे. काहीजण प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करतात आणि त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. काहींना थकवा, स्नायूंच्या वेदना तर काहींना हृदयाशी निगडित समस्या उद्‌भवू शकते.

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. धैर्यशील कणसे यांनी सांगितले की, ‘नियमित व्यायाम आणि अधिक प्रमाणात होणारा व्यायाम यात फरक आहे. लोकांना वाटते की, अधिक व्यायाम केल्याने हृदयाच्या समस्या होणार नाहीत. पण ते चुकीचे आहे. व्यायामाचा वेळ, प्रकार हे प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार वेगवेगळे असते. त्यामुळे जिममध्ये भली मेहनत करणाऱ्यांनी वेळोवेळी आपल्या शरीराची चाचणी करणे गरजेचे आहे. वळून ताणून कोणतीही गोष्ट करू नये.’

जास्त व्यायामाचा परिणाम...

  • काम करण्यासाठी शारीरिक क्षमता नसणे

  • सतत विश्रांतीची आवश्‍यकता वाटणे

  • स्नायू किंवा हातपाय दुखणे

  • थकवा जाणवणे

  • नैराश्यग्रस्त होणे

  • चिडचिड वाढणे

  • झोप न येणे

  • चिंता वाढणे

हे करा...

  • व्यायाम केल्यावर आहाराकडे ही लक्ष देणे

  • योग्य आणि अनुभवी प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार जिम किंवा घरी व्यायाम करणे

  • अधिक व्यायामामुळे कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास विश्रांती घेणे

  • आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेत त्याप्रमाणे व्यायाम करणे

  • भरपूर पाणी पिणे व पुरेशी झोप आवश्‍यक

जिममध्ये वर्कआउटसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेला समजून घेतले जाते. त्यानुसार त्यांना व्यायाम, आहार याची माहिती दिली जाते. या सर्व गोष्टींचे योग्य पद्धतीने पालन करणे गरजेचे आहे, तसेच अनुभवी ट्रेनर यांच्याकडून सांगितले जाणारे व्यायाम केले पाहिजे. त्यापलीकडे जाऊन शरीराला ताण दिल्यास नक्कीच याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो.

- नीलेश काळे, जिमचालक

बऱ्याचदा सोशल मीडियावर फिटनेस किंवा वर्कआउटचे व्हिडिओ पाहून नागरिक ते करण्यास सुरुवात करतात. पण, त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आपल्या शरीराची क्षमता याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

- प्रशांत झुरंगे, फिटनेस ट्रेनर

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63812 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top