महापालिकेवर ४२ कोटींची नुकसान भरपाई निश्चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेवर ४२ कोटींची नुकसान भरपाई निश्चित
महापालिकेवर ४२ कोटींची नुकसान भरपाई निश्चित

महापालिकेवर ४२ कोटींची नुकसान भरपाई निश्चित

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न केल्याने झालेली पर्यावरणाची हानी भरून काढण्यासाठी पुणे महानगरपालिका ४२ कोटी २३ लाख ७१ हजार ७६३ रुपयांची नुकसान भरपाई देण्यास जबाबदार असल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) सादर केला आहे.

उरळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचराडेपोत टाकलेल्या कचऱ्याचे जैव-उपचार (बायो-रीमेडीएशन), जैव खणन (बायो-मायनिंग) पूर्ण करण्यास विलंब झाल्याने तसेच ही जागा पूर्ववत करण्यात अपयश आल्याने महानगरपालिकेकडून नुकसान भरपाईपोटी दंड घेण्यात यावा, असे अहवालातून सुचविण्यात आलेले आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी येथील कचरा डंपिंग साइटवरील गैरकारभार, प्रदूषण, दुर्गंधी, प्रदूषित भूजल आणि येथील रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्न याबाबत ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत एनजीटीत दावा दाखल केला आहे. या दाव्याच्या सुनावणीदरम्यान एनजीटीचे अध्यक्ष आदर्श कुमार गोयल, न्यायिक सदस्य सुधीर अग्रवाल, ब्रिजेश सेठी आणि तज्ञ सदस्य डॉ. नगीन नंदा यांनी आदेश दिला होता की, सीपीसीबी आणि एमपीसीबी यांनी कचरा डेपोच्या जागी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घ्यावी आणि महापालिकेने केलेल्या पर्यावरण नुकसानीचा अहवाल तयार करून प्रशासनाला किती दंड आकारावा याची माहिती सादर करावी. त्यानसुर सीपीसीबीचे शास्त्रज्ञ ‘ई’ प्रादेशिक संचालनालय शशिकांत लोखंडे आणि एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी प्रताप जगताप यांनी याबाबतचा अहवाल तयार करून महापालिकेने अस्वच्छता व अनारोग्य वाढवणाऱ्या घनकचरा व्यवस्थापनात दाखविलेल्या दिरंगाई बद्दल ४२ कोटी रुपयांची पर्यावरणीय नुकसान भरपाई वसूल करावी, असा अहवाल सादर झाला आहे.

नुकसान भरपार्इतून कोरोना कालावधी वगळला :

फेब्रुवारी २०२० ते जानेवारी २०२२ हा कालावधी कारवार्इतून वगळण्याची विनंती न्यायाधिकरणाकडे करण्यात आली होती. त्यामुळे हा कालावधी वगळण्यात आला आहे. त्यानुसार ३२ कोटींची नुकसान भरपार्इ, भांडवली खर्चाचा घटक, कचरा बायो-मायनिंग सुविधेसाठी किरकोळ सरासरी भांडवली खर्च, पर्यावरणीय इतर बाबींचा विचार करून एकूण ४२ कोटी रुपये वसूल करण्याचा अहवाल देण्यात आला आहे. यावर आक्षेप घेणार असल्याचे ॲड. सरोदे आणि याचिकाकर्ते तृणाल टोणपे, अजित देशपांडे आणि अक्षय देसाई यांनी सांगितले.

प्रदूषणाचे प्रमाण अत्यंत वाईट

कचऱ्याच्या जागेचे कॅपिंग (व्यवस्थापन) पूर्ण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेद्वारे सप्टेंबर २०२४ उजाडेल असे प्रस्तावित करणेच बेकायदेशीर आहे. कचरा डेपोवर साठलेल्या व तेथे जमा झालेल्या कचऱ्यामुळे डेपोजवळील वातावरणातील हवेची गुणवत्ता आणि भूजल यांच्या होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण अत्यंत वाईट पद्धतीने बिघडले असल्याचे अहवालात नमूद आहे.

उरळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न केवळ त्या भागात राहणाऱ्या नागरिकांचा नाही तर संपूर्ण पुणे शहराचा आहे. परंतु महापालिकेने कधीच प्रामाणिकपणे व प्राधान्याने कचरा प्रश्नांवर काम केले नाही. त्याचा परिमाण म्हणून ही नुकसान भरपार्इ वसूल करण्याचा अहवाल देण्यात आला आहे.
-ॲड. असीम सरोदे, याचिकाकर्त्यांचे वकील

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82394 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..