Ananya Review : काही बाबी अतार्किक; पण जिद्दीची कथा पाहण्यासारखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ananya Marathi Movie
अनन्या नवा चित्रपट

Ananya Review : काही बाबी अतार्किक; पण जिद्दीची कथा पाहण्यासारखी

Ananya Marathi Movie Review

प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येत असतात. अशा प्रसंगाच्या वेळी आपण मनाने खचून जातो, निराशेने घेरले जाते. अशा अवघड आणि कठीण परिस्थितीत जिद्दीने व आत्मविश्वासाने कसे उभे राहावे, आपल्यावर आलेल्या प्रसंगातून मार्ग काढीत आत्मविश्वासाने कशी भरारी घ्यावी याची कथा म्हणजे ‘अनन्या’ हा चित्रपट. ‘शक्य आहे, तुम्ही ठरवाल ते शक्य आहे,’ हा या चित्रपटात मांडण्यात आलेला विचार प्रेरणा देणारा आहे. लेखक व दिग्दर्शक प्रताप फड आणि त्यांच्या टीमने ‘अनन्या’ या नाटकावरून बनविलेला चित्रपट आशादायी आणि प्रेरणादायी असाच आहे.

हेही वाचा: Prajakta Mali : प्राजक्ताचे साडी प्रेम ! चाहते म्हणाले, आजच्या ठळक बातम्या

‘अनन्या’ची कथा आहे अनन्या नावाच्या एका जिद्दी आणि अत्यंत हुशार मुलीची. अनन्या देशमुख ही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. ती वडील (योगेश सोमण) आणि भाऊ (सुव्रत जोशी) यांच्याबरोबर राहात असते. भाऊ एमबीए झालेला असतो, मात्र बेरोजगार असतो. अनन्याची जीवश्च कंठश्च मैत्रीण असते प्रियांका (ऋचा आपटे). अनन्याची स्वतःची काही स्वप्ने असतात. तिला सीए व्हायचे असते. परंतु, त्याचदरम्यान तिचे वडील तिच्यासाठी शेखर सरपोतदार (चेतन चिटणीस) नावाच्या मुलाचे एक मोठ्या कुटुंबातील स्थळ आणतात. त्यानुसार अनन्या व शेखर यांचा साखरपुडा होतो.

एके दिवशी अनन्या आणि शेखर लाँग ड्राईव्हला जायचे ठरवतात. अनन्याच्या आवडत्या सायकलीवरून ते दोघे लाँग ड्राईव्हला जात असतात आणि त्याच वेळी एक मोठी दुर्घटना घडते. या दुर्घटनेचा जबरदस्त मानसिक धक्का अनन्याला बसतो. या धक्क्यातून अनन्या कशी सावरते, ती जिद्दीने पुन्हा कशी उभी राहते, या मानसिक धक्क्याच्या वेळी तिला कोण आणि कशी मदत करते, तिच्या अॅगेजमेंटचे पुढे काय होते अशी एकूणच अनन्याच्या संघर्षाची कहाणी या चित्रपटात आहे. (Ananya Marathi Movie Cast)

हेही वाचा: 'आशिक बनाया आपने'.. हे गाणं आलं आणि हिमेश रेशमियाचे दिवस पालटले..

दिग्दर्शक प्रताप फड यांनी अनन्याच्या संघर्षाची ही कथा मांडताना वडील-मुलगी, भाऊ-बहीण, तसेच जीवलग मैत्रीण या नात्यांमधील विविध भावनिक बंध छान गुंफलेले आहेत. त्यामुळे चित्रपट भावनिकदृष्ट्या खिळवून ठेवणारा झाला आहे. प्रियांका आणि अनन्या यांच्यातील मैत्रीचा धागा छान गुंफण्यात आाला आहे. मध्यंतरानंतर होणाऱ्या जय दीक्षितच्या (अमेय वाघ) एन्ट्रीमुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक वाढते व कथा हसतखेळत पुढे सरकतो. हृता दुर्गुळे (Hruta durgule), योगेश सोमण, सुवृत्त जोशी, अमेय वाघ, ऋचा आपटे, सुनील अभ्यंकर, रेणुका दफ्तरदार अशा सगळ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. हृता दुर्गळेने अनन्याच्या भूमिकेकरिता खूप मेहनत घेतली आहे. ऋचा आपटेचेही कौतुक करावे लागेल. प्रियांकाची तिने साकारलेली भूमिका दमदार आहेच शिवाय मैत्री कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे तिची भूमिका. जय दीक्षितच्या भूमिकेमुळे चित्रपट हलकाफुलका झाला आहे. चित्रपटातील संगीत आणि सिनेमॅटोग्राफी छान झाली आहे. मात्र, चित्रपटाचा पूर्वार्ध खिळवून ठेवणारा झाला असला तरी मध्यंतरानंतर चित्रपट काहीसा ताणलेला वाटतो. चित्रपटातील काही बाबी अतार्किक आहेत. मात्र, एकूणच अनन्याच्या संघर्षाची, तिच्या जिद्दीची ही कथा पाहण्यासारखी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82444 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top