
वसंतरावांचा संघर्ष लोकांपर्यंत पोहोचल्याचे समाधान
पुणे, ता. २५ ः ‘मी वसंतराव’ चित्रपट पाहिल्यानंतर अमेरिकेतील एका महिलेने वयाच्या ५० व्या वर्षी पुन्हा गाणे सुरू करत असल्याचे कळवले. अनेकांनी नव्याने काही करण्याची उमेद मिळाल्याचे सांगितले. हेच चित्रपटाचे खरे संचित आहे. वसंतरावांचा संघर्ष लोकांपर्यंत पोहोचला याचे समाधान आहे, अशी भावना गायक, संगीतकार, अभिनेते राहुल देशपांडे यांनी सोमवारी व्यक्त केली.
देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला. यानिमित्ताने पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित सांस्कृतिक कट्टा कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, सरचिटणीस पांडुरंग सरोदे, उपाध्यक्ष संदीप पाटील व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘रसिकांसह शासन दरबारीही चित्रपटाची दखल घेतल्याचे समाधान आहे’, असे देशपांडे म्हणाले.
‘मी वसंतराव’ चित्रपट करतानाच केवळ किश्श्यांवर आधारित चित्रपट करायचा नाही, हे मी व दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी ठरवले होते. प्रत्येकाला आपला वाटेल असा वसंतराव देशपांडेंचा संघर्ष प्रामुख्याने दाखवायचा, हे निश्चित केले. त्यामुळेच बहुधा हा चित्रपट लोकांना आवडला. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ती सकारात्मक ऊर्जा होती. त्या सकारात्मकतेमुळे ही एक चांगली कलाकृती घडली आहे. या चित्रपटनिर्मितीच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले, असे देशपांडे यांनी सांगितले.
फ्युजनला विरोध कशाला?
अलीकडे फ्युजन प्रकारावर होणाऱ्या टीकेबद्दल विचारले असता राहुल देशपांडे म्हणाले, ‘‘संगीतातला जाणकार व्यक्ती फ्युजनला कधीच विरोध करणार नाही. फ्युजन काही अलीकडचा प्रकार नाही. आपल्याकडे १९६० पासून विविध संगीतकार याचा प्रयोग करत आहेत. त्यामुळे विरोध करण्यापूर्वी फ्युजन समजून घ्यायला हवे. अर्थात फ्युजन करणाऱ्यांनीही गाण्याच्या बाजाचे, त्याच्या अर्थाचे भान ठेवायला हवे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83090 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..