
बनावट ‘पीएनआर’वर मोफत प्रवास रेल्वेला गंडा घालणाऱ्या प्रवाशाला अटक
पुणे, ता. २५ : ‘तो’ कधी महालक्ष्मी एक्स्प्रेसने, तर कधी सिद्धेश्वर एक्स्प्रेसने प्रवास करायचा. रेल्वे गाड्यांमध्ये बदल करायचा मात्र सीट क्रमांकात मात्र पठ्याने कधी बदल केला नाही. तिकीट निरीक्षकांनी तिकीटाबाबत विचारले तर मोबाईलवरचा बी १ - २७ हा सीट क्रमांक असलेला पीएनआर दाखवायचा. एकच सीट क्रमांक सांगून जवळपास वीस रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातून वेगवेगळ्या शहरांचा प्रवास करायचा. मात्र त्याच्या याच स्पेशल बी १-२७ क्रमांकामुळे तो तिकीट पर्यवेक्षकांना खटकला आणि त्याचा पुढचा प्रवास कोठडीच्या दिशेने झाला.
मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये ऑन ड्यूटी काम करणारे तिकीट पर्यवेक्षक राजेश देवरे यांना प्रणव देशपांडे (रा. सांगली) हा भामटा प्रवासी रविवारी रात्री पुणे स्थानकावर वावरताना आढळला. हा दोनच दिवसांपूर्वी जोधपूर एक्सप्रेसच्या बी १ कोचमधून प्रवास करताना आढळला होता. त्यावेळी त्याच्याकडे तिकिटाची मागणी केल्यावर बी १-२७ हे माझे सीट आहे. असे सांगून मोबाईलवरचा संदेश दाखवीत त्याने सीट बदलून घेतले असल्याचे सांगितले.
अधिक चौकशी केल्यावर त्याने तिथून पळ काढला होता. त्यामुळे देवरे यांच्या तो लक्षात राहिला होता. सोमवारी तो पुणे स्थानकावर दिसताच त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने बनावट पीएनआरच्या माध्यमातून वीसहून अधिक रेल्वेत फुकटात प्रवास केला असल्याचे मान्य केले. या वेळी तिकीट निरीक्षक एन. एल. गुप्ता यांनीदेखील त्याला पकडण्यात मदत केली.
कसा करायचा प्रवास
तो एखाद्या रेल्वेत प्रवेश केल्यावर तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्यात प्रवास करायचा. एकट्या प्रवाशास हेरून त्याला सीट बदलण्याची विनंती करायचा. टीसीने विचारल्यावर त्याच्याजवळच पीएनआरचे तपशील दाखवायचा. ज्या प्रवाशाचे सीट बदलले आहे. त्याचे तिकीट अधिकृत असल्याने टीटीदेखील अनेकदा अधिक तपास न घेता आपल्या कामाला लागायचे. मात्र वारंवार तो सीट बी १-२७ हेच सांगायचा. शिवाय त्याचा वावरदेखील संशयास्पद असल्याने त्याचा फोटो काहींनी टीटींच्या व्हॉट्सॲप ग्रुपलाही पाठविले होते. त्यामुळे त्याची लगेच ओळख पटली. त्याला पुणे आरपीएफने ताब्यात घेतले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83261 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..