शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : ‘‘जूनमध्ये शाळा सुरू झाल्यापासून नववीचा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. परंतु हा अभ्यासक्रम शिकताना आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सुरू आहे. ऑगस्टमध्ये नववीची पहिली घटक चाचणी आहे, परंतु, आता शिष्यवृत्ती परीक्षा पाच दिवसांवर आल्याने या परीक्षेची तयारी करत आहे,’’ असे सांगत वेदश्री साबणकर हिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

वेदश्रीप्रमाणेच राज्यातील जवळपास सव्वासात लाख विद्यार्थी इयत्ता सहावी आणि नववीमध्ये असताना पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहेत. त्यामुळे एकीकडे शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम शिकत असताना मागील वर्षी केलेला आणि आतापर्यंत करत असलेला शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम समजून ठेवत या परीक्षेची तयारी करण्याची कसरत विद्यार्थ्यांना करावी लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीची (२०२१ मधील) शिष्यवृत्ती परीक्षा लांबली होती आणि ही परीक्षा १२ ऑगस्ट २०२१ मध्ये झाली. आता फेब्रुवारी-२०२२ मध्ये होणे अपेक्षित असलेली इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या रविवारी (ता. ३१) होणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलै रोजी होणार होती. परंतु राज्यात अनेक जिल्ह्यांत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलली होती. आता ही परीक्षा रविवारी होणार असून विद्यार्थ्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

शिष्यवृत्ती परिक्षेविषयी...
४८,०८०
- एकूण नोंदणी झालेल्या शाळा

४,१७,८९४
- पाचवीचे विद्यार्थी

३,०३,६९७
- आठवीचे विद्यार्थी

७,२१,५९१
- एकूण विद्यार्थी

५,७०७
- परीक्षा केंद्रांची संख्या


विद्यार्थ्यांची अंतिम टप्प्यातील तयारी
१) शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाची सातत्याने उजळणी करणे
२) अभ्यासातील अडचणी शिक्षकांकडून समजून घेणे
३) यापूर्वी झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडविणे
४) प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव सुरू
५) शिक्षकांचे मार्गदर्शन घेत स्वयं अध्ययन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षा सातत्याने पुढे ढकलल्या जात आहेत. परिणामी, पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा या इयत्तेतील विद्यार्थी अनुक्रमे सहावी आणि नववीत गेल्यानंतर होत आहे. जूनपासून शालेय शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर ऑगस्टमध्ये पहिली घटक चाचणी परीक्षा घेण्यात येते. परंतु, सहावी आणि नववीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करावी लागत असल्याने या विद्यार्थ्यांची दुहेरी कसरत सुरू आहे. त्यामुळे शिक्षण विभागानेही यापुढे शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणे त्या-त्या वर्षी फेब्रुवारीमध्ये होतील, हे नियोजन करावे.
- संजय सोमवंशी,
मुख्याध्यापक, सुंदरबाई मराठे विद्यालय

इयत्ता पाचवीत असतानाही शिष्यवृत्तीची परीक्षा दिली होती. परंतु, ती परीक्षा मी पाचवीत असतानाच झाली होती. परंतु सध्या मी इयत्ता नववीत असून आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहे. नववीचा अभ्यास शिकत असताना आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करावी लागत आहे. त्यासाठी उजळणीवर भर देत आहे. परीक्षेतील इंग्रजी आणि बुद्धिमत्ता अभ्यासक्रम सोपे जातात. परंतु मराठी व्याकरण आणि गणिते सोडविण्याची जास्त तयारी करत आहे.
- श्रावणी कुटे,
विद्यार्थिनी (आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा देणारी)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83338 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..