
‘पुरुषोत्तम’मध्ये यंदा १० नवीन महाविद्यालये
- महिमा ठोंबरे
पुणे - पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेण्याची संधी यंदा १० नवीन महाविद्यालयांना मिळणार आहे. ही महाविद्यालये यंदाच्या स्पर्धेतून ‘पुरुषोत्तम’मध्ये पदार्पण करत असून पहिल्याच सादरीकरणासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत. इतर संघांना तुल्यबळ लढत देण्यासाठी ते आता कसून तयारी करत आहेत.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत दरवर्षी ५१ संघ भाग घेतात. यातील ४१ संघ पुन्हा पुढील वर्षी भाग घेऊ शकतात, तर परीक्षकांच्या मते दर्जा खालावलेल्या १० संघांना पुढील वर्षी भाग घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे दर्जा खालावलेले संघ आणि नवीन प्रवेश घेऊ इच्छिणारे संघ, यांच्या नावांच्या चिठ्ठ्या काढल्या जातात. त्यातून निवडलेल्या संघांना स्पर्धेत भाग घेता येतो. यंदाही याच पद्धतीने चिठ्ठ्या काढल्यानंतर १५ संघांचा स्पर्धेतील प्रवेश निश्चित झाला. यातील सात महाविद्यालयांचे संघ पहिल्यांदाच स्पर्धेत भाग घेणार आहेत.
पहिल्यांदाच स्पर्धेत भाग घेत असले तरी ही सर्व महाविद्यालये सादरीकरणाची जय्यत तयारी करत आहेत. यातील काही संघांची तर पहिलीच नाट्य स्पर्धा असल्याने संहितेच्या शोधापासून नाटकाची मुळाक्षरे ते गिरवत आहेत. परंतु, केवळ चांगल्या सादरीकरणावर समाधान न मानता नेहमीच्या संघांना कडवी लढत देण्याचा प्रयत्न असल्याचा मानस या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. अनेक वर्षे प्रयत्न केल्यानंतर भाग घेण्याची संधी मिळाल्याने या संधीचा सदुपयोग करण्यासाठी प्राध्यापकही विद्यार्थ्यांना पाठबळ देत आहेत.
महाविद्यालयाची स्थापना पाच वर्षांपूर्वीच झाल्याने यापूर्वी ‘पुरुषोत्तम’मध्ये सहभाग घेतला नव्हता. यंदा पहिल्यांदाच अर्ज केला आणि प्रवेशही मिळाला आहे. आमची संघ म्हणून ही पहिलीच एकांकिका स्पर्धा आहे, त्यामुळे थोडेसे दडपण आहे. पण संघातील एका विद्यार्थ्याला लेखन-दिग्दर्शनाचा अनुभव असल्याने त्यानेच संहिता शोधली, त्यावर आता काम करत आहोत.
- अनुजा म्हात्रे, विद्यार्थिनी, डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल, ताथवडे
आमच्या महाविद्यालयातर्फे यापूर्वी फारशा नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतला जात नव्हता. गेल्यावर्षी फिरोदिया करंडक स्पर्धेत भाग घेतल्यानंतर या स्पर्धांविषयी आमची उत्सुकता वाढली आणि त्यातून ‘पुरुषोत्तम’साठी प्रवेश घेतला. मागच्या सादरीकरणातील चुकांमधून शिकत दमदार सादरीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी दररोज तालमी करत आहोत.
- ऋचा शेलार, विद्यार्थिनी, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर सायन्स, पिंपरी-चिंचवड
पहिल्यांदाच भाग घेणारी महाविद्यालये
डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल, ताथवडे
रत्नाई महाविद्यालय, राजगुरुनगर
प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर सायन्स, पिंपरी-चिंचवड
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी, मॅनेजमेंट अँड रिसर्च, आकुर्डी
बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर
ट्रिनिटी ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र अभिमत विद्यापीठ, पुणे
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83386 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..