
मुख्य परीक्षेत २०२५ पासून बदल करा
पुणे, ता. २७ ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुख्य परीक्षेतील बदलांमुळे जुन्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे. अतिरिक्त १५०० गुण, वैकल्पिक विषय, निबंध लेखन आणि लेखनाचा सराव यासाठी पुरेशा प्रमाणात वेळ मिळणार नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर पडू शकतात. या बदलाचा थेट फायदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे नवीन बदलाची अंमलबजावणी २०२३ ऐवजी २०२४-२०२५ पासून करावी, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या.
‘‘नविन अभ्यासक्रमाचे साहित्य पुरेशा प्रमाणात मराठीमध्ये उपलब्ध नाही. अभ्यासक्रम खूप मोठा असल्यामुळे तयारीसाठी वेळ अपुरा आहे. याचा यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.’’
- परेश (नाव बदललेले)
‘‘एमपीएससीने नवीन बदल करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. दर्जेदार अधिकारी भेटावेत म्हणून बदल केलेत, तर यापूर्वीचे विद्यार्थी दर्जेदार नव्हते का? मराठी मुलांवर अन्याय होणार आहे. परीक्षेच्या तयारीसाठी तरी अपेक्षित वेळ द्यावा.’’
- धनश्री (नाव बदललेले)
‘‘वैकल्पिक विषय निवडण्यासाठी ज्या विषयाची यादी दिली आहे. त्यामध्ये उर्दू साहित्याचा समावेश नाही. सुधारित मुख्य परीक्षेत निबंध हा केवळ मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिता येणार आहे. उर्दू माध्यमातून शिकलेल्या उमेदवारास येथे उर्दू भाषेतून निबंध लिहिण्याची परवानगी नाही. अनेक राज्यात उर्दू भाषेत निबंध लिहिण्याची परवानगी आहे.’’
- कासार रशीद, माजी मुख्याध्यापक, लातूर
‘‘एमपीएससीचा निर्णय ७५ टक्के चुकीचा वाटतो. कारण, त्यांनी पूर्णपणे यूपीएससीला कॉपी केले आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला फक्त एमपीएससी करायची असेल, तर त्याने यूपीएससीचा अभ्यास का करावा? इतर कोणत्याही राज्याच्या आयोगाने थेट यूपीएससीला कॉपी केलेले नाही. त्यांची स्वतःची परीक्षा पद्धती आहे.
- सागर (नाव बदललेले)
‘‘वैकल्पिक विषय फक्त उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आहे. अन् तोही रद्द होण्याच्या मार्गावर आहे. आता तर जिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदारसाठी एकच अभ्यासक्रम झाला आहे. निदान पदाच्या पात्रतेनुसार तरी अभ्यासक्रम ठेवायला हवा होता.’’
- प्रगती (नाव बदललेले)
‘‘सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लोकांनी आपल्या मुलांना अधिकारी होण्यासाठी आपले दागिने, शेतजमीन गहाण ठेऊन विद्यार्थ्यांना अभ्यास करायला सांगत आहेत. अशा निर्णयामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना मानसिक दडपण आले आहे. विद्यार्थ्यांना तयारीसाठी दोन वर्षांचा कालावधी देऊन सध्याचा निर्णय २०२५ पासून लागू करावा.’’
- अश्वित काळभोर, लोणी काळभोर
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83429 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..