
पुण्यात ओबीसी आरक्षणाची एक जागा कमी
पुणे, ता. २६ ः पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता. २९) सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे काढण्यात येणार आहे. पुण्यात ओबीसीच्या ४७ जागा असल्याचे सांगितले जात होते, पण निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार एक जागा कमी झाली असून, ४६ जागांवर ओबीसीचे आरक्षण काढले जाणार आहे; तर सर्वसाधरण प्रवर्गासाठी एक जागा वाढणार आहे, असे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणूका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असेच निश्चित झाले होते. त्यानुसार आयोगाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेत १७३ जागांपैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाचे २५ प्रभागातील आरक्षण निश्चित करून उर्वरित १४८ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर केल्या. पण, सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारून पुन्हा ओबीसी आरक्षण कायम ठेवले, त्यामुळे निवडणुकांचे गणितच बदलून गेले आहे.
ओबीसी समाजासाठी २७ टक्के आरक्षीत जागा असतात, त्यानुसार पुणे शहरात ४७ जागा आरक्षीत होणार होत्या. मात्र, निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार ओबीसीसाठी ४६ जागा आरक्षीत असतील, कमी झालेली एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सोडत काढताना ओबीसीच्या २३ जागा सर्वसाधारण गटासाठी व २३ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.
‘‘निवडणूक आयोगाकडून नवे आदेश मिळाले आहेत, त्यामध्ये आरक्षणाच्या टक्केवारीची मर्यादा पाळण्यासाठी ओबीसीसाठी ४७ ऐवजी ४६ जागा आरक्षीत असणार आहेत. त्यानुसार आरक्षणाची सोडत काढली जाईल. यामध्ये आयोगाच्या नियमानुसार ओबीसी महिला, सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण व सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागा निश्चीत केल्या जातील.’’
- यशवंत माने, उपायुक्त, निवडणूक शाखा
असे असेल प्रभागाचे आरक्षण (कंसात महिला सदस्य)
एकूण जागा - १७३ (८७)
अनुसूचित जाती - २३ (१२)
अनुसूचित जमाती - २ (१)
ओबीसी - ४६ (२३)
सर्वसाधारण प्रवर्ग - १०२ (५१)
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83559 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..