थेंब रुपेरी मंदील बांधून आला श्रावण!-प्रविण दवणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थेंब रुपेरी मंदील बांधून आला श्रावण!-प्रविण दवणे
थेंब रुपेरी मंदील बांधून आला श्रावण!-प्रविण दवणे

थेंब रुपेरी मंदील बांधून आला श्रावण!-प्रविण दवणे

sakal_logo
By

थेंब रुपेरी मंदील बांधून आला श्रावण!
-प्रविण दवणे

दृष्टी रंगीत करतो तो कवी! श्रेष्ठ कवींच्या सोबतीने श्रावणवैभव अनुभवणं, म्हणूनच एक मैफल होतं. वैशाखाच्या धगीनं आसावलेली, आषाढाच्या धुव्वाधार धारांनी तृप्तावलेली वसुंधरा श्रावणात सुखाने धुंदावते. एखाद्या लाडावलेल्या महाराणीने आपल्या रत्नाभूषणांकडे कौतुकाने पहावे तशी नादावते. वसुंधरेचे हे रंगगंधील नि गंधरंगीत रुप जीवनलुब्ध कवींना साद घालते. वा रूपवातील कंटक काही क्षण मखमालीचे होतात. असा काही कवितेतला मनोरम श्रावण, श्रावणाच्या सोनवर्खी उंबरठ्याशीच अनुभवणं, हा अनुभवच मग ‘श्रावण’ होतो.

कवी बा. भ. बोरकर म्हणजे कवितेतला तुडुंब आषाढ श्रावणच! त्यांना,
गिरीदरीतुनी झरे - नव्हे हे हिरे उसळती निळे
ढगाढगांतुनि अन् वाऱ्यापरी ऊन गळे कोवळे
असे निसर्गाच्या प्रपातरुप झालेल्या प्रवाहात उसळणारे निळे हिरेच जाणवतात. उदंड पाण्यांनी हिरवळीला, तृणपात्यांना रत्नांचा मोहर आला आहे हे जाणवते. सर्वत्र लोभस मांगल्य!
हळद लावूनी आले ऊन
कुंकुमाक्षता फुलांमधून
झाडांमधूनी झडे चौघडा
घुमते पाणी लागून धून
असा महोत्सव आतला सोहळा उलगडून दाखवतो.

कवी ग्रेस हे प्रतिमांतून बोलणारे गूढ चिंतनशील व्यक्तिमत्त्व. एरवी जगण्यातील अनाम तंतूंचा विलक्षण आर्ततेने शोध घेणारा हा कवी, श्रावणाचे पदर उलगडताना निसर्गरंगांचे जलचित्र रेखाटतो. अतिशय तरलतेने ग्रेस श्रावणचित्र रंगवतात.
हा श्रावण गळतो दूर
नदीला पूर
तरुवर पक्षी
घन ओले त्यांतुन
चंद्र दिव्यांची नक्षी...
ओल्या घनातून उघडामिट करणारी किरणे चांदण्याचे दिवेच जीवनपात्रात सोडत येतात. श्रावणातील चंद्रओल्या उन्हाचे असे चित्रण आपल्याला वेगळी ‘दृष्टी’ देतं. या श्रावणाच्या पावलांनी सृजनाच्या वत्सल शक्यता त्यांना जाणवतात. ‘हा श्रावण वाजवी धून’ ही ओळ अंतस्थ वीणेला स्पर्श करीत निसर्गसूर छेडीत येते.

कवी अनिल यांनी ‘श्रावणझड’ या दशपदीतून श्रावणाचे निराळेच भावचित्र रेखाटले आहे. श्रावणाच्या झडीने आतले भावविश्व कसे उहुवते, यांची तरल अभिव्यक्ती ते करतात. आपल्याला ‘श्रावणसर, श्रावणाची रिमझिम, क्षणात सरसर येते शिरवे’, हे पुन्हा वाचण्याची, ऐकण्याची सवय झालेली असते. परंतु जरा
आडोशाला विसावलेल्या मनावर अचानक बरसून, तितक्याच तत्परतेने जी निघून जाते, ती ‘झड’! कवी अनिल जेव्हा ‘श्रावणझड’ असे म्हणतात तेव्हा ती केवळ कवीची ‘सर’ होत नाही, आयुष्याच्या पडझडीला जागे करणारी ‘झड’ होते. ‘श्रावणझड’ या दशपदीतून सुंदरतेहूनही अंतर्मुखतेची अंतर्धून अधिक जाणवते-
श्रावणझड बाहेरी मी अंतरि भिजलेला
पंखी खुपसून चोच एक पक्षी निजलेला
हा पंखात चोच खुपसून निजलेला पक्षी कुठे दूर झाडावर असेलही, पण त्या झाडाची मूळे कवीमनाच्या भुईतही आहेतच. तो पक्षी हे स्वतःत घडेलेले अंतर्याम आहे. पुढे प्रत्येक ओळीतून श्रावणप्रतिमांना वेगळे वलय देत कवी अनिल श्रावणाचे अंतर्मनच उलगडतात.
अभ्रांचा ह्रदयभार थेंबथेंब पाझरतो
विझलेला लांब दिवस चिंब होत ओसरतो
हा ह्रदयभार दाटलेल्या अभ्रांचा? की आयुष्यातील स्मरणांचा? हा थेंबभार प्रत्यक्ष श्रावणझडीचा की आसवांचा? याचं ढोबळ उत्तर नाही. तो एक भावोद्गार आहे. श्रावणाचा हा अंतस्थ सूर टिपणारे कवी अनिल त्यांच्या कवितेतून आपल्याला ‘सरी’तून ‘झडी’त नेतात.

कवी द. भा. धामणस्कर हे ‘येता श्रावण’ काय घडते, आषाढाच्या भरून आलेल्या घनदाट घनांनाही श्रावणराज येता येता निसर्गविभ्रम असे बहरतात याचे मन प्रसन्न करणारे..एरव्ही आपण श्रावण अनुभवतो त्याहून वेगळे चित्र व्यक्त केले आहे. कवी धामणस्कर म्हणतात,
तिसऱ्या दिवशी जिद्द संपली
हटवादी त्या रानफुलांची,
येता श्रावण जिद्द लोपली
प्रकाशवैरी कृष्ण घनांची
आषाढघनांनी सृष्टीवर रवीकिरण येऊ नये, अशी छाया गडद केली. पण श्रावणाच्या तिसऱ्याच दिवशी ही जिद्द लोपून सृष्टी उगवलीच! पुन्हा जग नव्या सुखात तृप्तीच्या नंदनवनात निघाले आहे. गच्च आलेली पर्णेही आता श्रावणाच्या हळदुच्या पावलांना वाट करून देत आहेत, नि पुन्हा नीलरंगी पुरुषोत्तम नि वैदेही-ती भूमीकन्या सीता यांची आर्त भेट झाल्यासारखे कवीला जाणवले आहे.
जेव्हा भेदून काळे पत्थर
किरण थडकले या पृथ्वीवर
अन् वैदेहिस चिंब आसवी
पुन्हा भेटला तो पुरुषोत्तम..
येता श्रावण...!
निसर्गरंगाला पुराणकथांतील व्यक्तिरेखा रुपरंग देत हा श्रावण, या श्रेष्ठ कवींना अधिक सुमंगल केला. बालकवींनी तर तो केव्हाच अजरामर केला, नि पिढ्यापिढ्यांना ‘हर्ष माइना ह्रदयात!’ म्हणत तो गुणगुणला. कवी मंगेश पाडगावकरांनी श्रावणाचे जलरंग चित्र रेखाटून त्याचेच भावगीत केले.
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंब्याचे फुलपाखरू झाले
असे म्हणत सृष्टी ज्या सुखाची वाट दिवसरात्र पहात होती, ते सुख, आता श्रावणाच्या रुपात दारात आले आहे, हा शुभसंकेत दिला. कवयित्री शांता शेळके यांनी तर श्रावणाला करुणाकर केले. आपल्या एरवीच्या एकसुरी जगण्याला ओलस करीत हा सह्रदयश्रावण बरसतो. त्या म्हणतात ः
रुक्ष धुळीच्या शहरावरती
सिंचन करतो श्रावण सह्रदय
धार झेलते माथ्यावरती
तृणपातेही लागुनिया लय.
आता हलकेहलके आभाळाचे आकाश होत आहे. निळाईचा विस्तार वाढू लागला आहे. वर निळाई नि खाली हिरवाई, अशामध्ये आता चैतन्यही काहीसे सुखशांत होत आहे. हे सारे श्रावणाने घडविले आहे. तेही सहजपणे..
गगनाचा विस्तार निळावर
अथांग खाली हिरवा सागर
श्रावणओल्या झुळुका येता
श्वास संथ घे मध्ये चराचर.
त्या श्रावणओल्या झुळुकांना आरंभ झाला आहे. मनातल्याही तृणपात्यांना लय लागली आहे. कवितांमधून दृष्टीची सृष्टी आशयघन करणारे हे कवी, जे क्षणांचं भावगीत करतात.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83802 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..