
जीवे मारण्याचा प्रयत्न; चौघांना सात वर्षांची सक्तमजुरी
पुणे, ता. २७ : मद्यपान करताना झालेल्या भांडणाच्या रागातून रिक्षाचालकावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केली. याप्रकरणी चौघांना न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला.
चिराज राजू कांबळे (वय २६), सागर राजू कांबळे (वय २५), डॅनी ऊर्फ सुशील राजू कांबळे (वय २२), मिलिंद अशोक गंडले (वय २८, सर्व रा. भीमनगर, मुंढवा) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. दंडाच्या रकमेपैकी ७५ हजार रुपये जखमी रिक्षाचालकाला देण्यात यावेत, तसेच दोषींनी दंड न भरल्यास एका महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे खटल्याच्या सुनावणीदरम्यान चार प्रत्यक्षदर्शी साथीदारांनी साक्ष फिरवली. मात्र, फिर्यादीची साक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या आधारे सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. याबाबत युवराज विठ्ठल गोडसे (वय २९) यांनी फिर्याद दिली होती. ही घटना २६ ऑक्टोबर २०१३ रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास मुंढव्यातील भीमनगर कमानीजवळ घडली. त्या दिवशी फिर्यादी युवराज गोडसे आरोपींसोबत जेवण करण्यासाठी मुंढव्यातील पिंगळेवस्ती येथे गेले. मद्यपान केल्यावर जेवणाच्या वेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर फिर्यादी घरी आले असता, चारही आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादींनी आरडाओरडा केल्यावर आरोपी पळून गेले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी फिर्यादींना ससून रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83873 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..