पुण्याची हवा सुधारतेय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्याची हवा सुधारतेय!
पुण्याची हवा सुधारतेय!

पुण्याची हवा सुधारतेय!

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खासगी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वाढणारा वापर, सौर ऊर्जेकडे वाढणारा कल यासह हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे पुण्यातील हवा सुधारत आहे. चहूबाजूने शहर वाढत असताना ही पुण्याच्या दृष्टीने स्वागतार्ह बाब असल्याचा निष्कर्ष पुणे महापालिकेच्या २०२१-२२ च्या पर्यावरण अहवालातून काढण्यात आला आहे.

पुणे शहराचा २०२१-२२ चा पर्यावरण अहवाल बुधवारी मुख्यसभेसमोर आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केला. यामध्ये शहरातील हवा, ध्वनी, जल, वृक्षसंपदा यासह इतर पर्यावरणाच्या घटकांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. पुण्यातील नागरिक पर्यावरणाबाबत अधिक संवेदनशील होत असून सौरऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये चार ते सहापटीने वाढ झाली आहे. नागरिकांनीही सौर ऊर्जेपासून १६.२० कोटी युनिट वीजनिर्मिती केली आहे. नागरिक सौर ऊर्जा युनिट बसवून त्याचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत, असे या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालात नमूद केले आहे. २०१९-२० मध्ये १२.१७ कोटी युनिट सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती केली गेली. २०२०-२१ मध्ये एकूण १६.२० कोटी विद्युत युनिटची वीज निर्मिती झाली आहे. चालू २०२१- २२ या वर्षात ५८ हजार २२८ नागरिकांनी सोलर वॉटर हिटर्स वापर केला आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

कोरोना संसर्गामुळे २०२० या वर्षात पूर्णपणे लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. २०२१ या वर्षात काही प्रमाणात लॉकडाऊन होते, पण व्यवहार पूर्वपदावर येत होते. तरीही २०२० च्या तुलनेत पुण्यातील हवा २०२१ मध्ये जास्त प्रदूषित झाली नाही. सूक्ष्म धूलिकण (पी.एम.१०) हे या वर्षभरात एकदाही वाईट व खूप वाईट या श्रेणीत गेले नसल्याने शहरातील हवा चांगली होती. २०२१ च्या ३६५ दिवसांपैकी १६३ दिवस शहरातील हवेची गुणवत्ता उत्तम होती,११४ दिवस समाधानकारक होती, तर ८८ दिवस हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची होती. २०१८, २०१९ च्या तुलनेत २०२० व २०२१ मध्ये उत्तम श्रेणीचे दिवस वाढले आहेत.

ई- वाहनांच्या खरेदीत वेगाने वाढ

पुण्यात २०२० मध्ये केवळ १ हजार ४५० इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती, २०२१ मध्ये यात ४.२८ टक्के वाढ झाली होऊन, ६ हजार २१९ वाहनांची नोंदणी झाली. तर २०२२ या वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मे २०२२ पर्यंत पुणे आरटीओ कार्यालयात ८ हजार २२० वाहनांची नोंदणी झाली आहे, त्यामुळे हे डिसेंबर २०२२ पर्यंत ही संख्या वेगाने वाढणार आहे. २०२०च्या तुलनेत २०२२ मध्ये साधारणपणे ६ पटीने इलेक्ट्रिक गाड्यांची खरेदी वाढल्याचे दिसून येत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) ताफ्यातील डिझेल बस काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची जागा सीएनजी आणि ई बस घेत आहेत. पीएमपीच्या ताफ्यातील २ हजार २५५ बसेस पैकी १ हजार ६५८ सीएनजी बस आहेत, तर ३१० ई बस आहेत. सध्या केवळ १२.३ टक्के बस डिझेलवर धावत आहेत.

‘‘कोविडच्या काळात शहर ठप्प झाले होते. आता शहर पूर्ववत होत आहे, तरीही प्रदूषणात फार वाढ झालेली नाही असे दिसून आलेले आहे. नागरिकांमध्ये इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचा कल वाढत आहे. पेट्रोल डिझेलवरील वाहने बीएस सिक्स श्रेणीची वाढल्याने त्यांचे प्रदूषणही कमी होत आहे. शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने हे एक स्वागतार्ह पाऊल आहे.
- मंगेश दिघे , पर्यावरण अधिकारी पुणे महापालिका
 

शहराची एकूण हद्द - ५१९ चौरस किलोमीटर
शहरातील उद्याने - २१०

हरित क्षेत्र - १९.७८ लाख चौरस मीटर
वृक्ष संख्या - ५१.०३ लाख


वाहनांची संख्या - ३३.२४ लाख
इलेक्ट्रिक वाहनांची संख्या- १५८८९
एलईडी दिव्यांची संख्या - १.८० लाख

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83961 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..