
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली
जागतिक व्याघ्र दिन २९ जुलै रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्रात ‘प्रोजेक्ट टायगर’ अंतर्गत पहिला व्याघ्र प्रकल्प मेळघाटात ४८ वर्षांपूर्वी सुरू झाला. अमरावती जिल्ह्यातील वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अभ्यासातून काही निष्कर्ष काढले आहेत. येथे वाघांची संख्या वाढली आहे, हे सुचिन्ह असल्याचं त्यांनी नमूद केलं.
नीला शर्मा
मेळघाटात दहा वर्षांपूर्वी वाघांची संख्या तीस होती, ती आता दुप्पट झाली अशी माहिती देऊन वडतकर म्हणाले, ‘‘पूर्वी मध्य प्रदेशाच्या सीमेवरून काही शिकारी येथे घुसखोरी करत. वाघांना मारून त्यांचं कातडं, हाडं वगैरे विकण्यासाठी ते शिकार करत. परंतु, मेळघाटातील वन अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे अशा अनेकांना अटक व शिक्षा झाली. परिणामी येथील वाघांच्या शिकारीला आळा बसला. दुसरी गोष्ट म्हणजे या परिसरात मानव आणि वन्यजीव संघर्ष फारसा नाही. तीन हजार चौरस किलोमीटरच्या या विस्तीर्ण प्रकल्प क्षेत्रात तीसेक गावं व लगतच्या भागात शंभर-दीडशे गावं आहेत. मात्र तेथील लोक वाघांच्या वाटेला जात नाहीत. उलट अशा गाव, वाड्या, वस्त्यांमध्ये वाघाचं एखादं तरी लहानमोठं मंदिर असतं. काही व्याघ्र प्रकल्प अथवा अभयारण्यांचं क्षेत्र तुलनेने लहान आहे. याउलट येथे ते प्रचंड असल्याने वाघांना दूरवर संचार करता येतो.’’
वडतकर यांनी स्पष्ट केलं की, अन्य व्याघ्र प्रकल्पांमधील वाघ, प्रजननासाठी योग्य जोडीदार शोधायला जंगलांतील संचारमार्गांनी दुसऱ्या व्याघ्र अधिवासात जाण्याचे प्रसंग घडतात. येथील भल्या मोठ्या प्रकल्प क्षेत्रात चार अभयारण्य व एक राष्ट्रीय उद्यानांसह अवाढव्य बाह्य संरक्षित क्षेत्रांचा समावेश आहे. येथे पर्यटकांची वर्दळ असते ती ठराविक जंगल क्षेत्रातील वनस्पती, प्राणी, पक्षी व दऱ्याडोंगरांचं अद्भुत रूप पाहण्यासाठी. वाघांच्या अधिवासाच्या गाभा क्षेत्रात पर्यटकांची वर्दळ नसते. अशा वेगवेगळ्या कारणांनी मेळघाटातील वाघांची संख्या वाढली आहे. एक मात्र खरं की, या भूभागात उंचच उंच डोंगर व खोल दऱ्यांमुळे वाघांना भक्ष्य शोधण्यासाठी पुष्कळ मेहनत पडते. तरीही येथील वाघ खडतर परिस्थितीशी जुळवून घेण्याइतके सक्षम आहेत. येथील वाघिणींना एका वेळी फक्त दोनच पिलं होतात, असं निरीक्षण आहे. काही ठिकाणच्या वाघिणींना चार पिलं होतात, तसं येथे आढळत नाही. कारण अत्यंत अवघड परिस्थितीत जगण्यालायक मोजकीच, पण बलवान संतती असावी, असा काहीसा निसर्ग संकेत त्यामागे असू शकतो. माझ्यासारख्या वन्यजीव अभ्यासकाला येथील वाघांचा अभ्यास हा बरीच नवी, वेगळ्या प्रकारची माहिती देणारा ठरला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84084 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..