महाविद्यालये सुरू पण वसतिगृहे बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविद्यालये सुरू पण वसतिगृहे बंद
महाविद्यालये सुरू पण वसतिगृहे बंद

महाविद्यालये सुरू पण वसतिगृहे बंद

sakal_logo
By

अक्षता पवार
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २९ ः शिक्षणाचे माहेर घर म्हणून आईने पुण्यात शिक्षणासाठी पाठविले. लहान होतो तेव्हा बाबा लष्करात देशसेवा बजावताना शहीद झाले. आई शिक्षिका असून जेमतेम कमाई. त्यात निवृत्ती वेतन पण कमी मिळते. त्यामुळे सैनिक कल्याण विभागाच्या पर्वती येथील मुलांच्या वसतिगृहात राहत होतो. तेथे मोफत राहण्याची आणि जेवणाची सुविधा उपलब्ध आहे. गेल्या दोन वर्षांपासून वसतिगृहे बंद होती आणि आता महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्यामुळे दररोज महाविद्यालयात हजेरी लावणे गरजेचे आहे. मात्र वसतिगृह बंद असल्याने रूमचे भाडे, जेवणाचा खर्चाचा ताण येऊ लागला आहे, असं सांगत होता पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेला २१ वर्षीय निखिल रेगे (नाव बदलण्यात आले आहे).
निखिल हा मुळचा मराठवाड्यातला असून २०१७ मध्ये तो पुण्यात आला. तो म्‍हणाला, ‘‘परीक्षेच्या काळात तरी आम्हाला वसतिगृहात प्रवेश द्यावा. जर निकालात आम्ही नापास झालो तर वसतिगृहातून काढा, असे प्रशासनास सांगितले. पण त्यासाठी सहकार्य केले जात नाही. मागील सहा महिन्यांपासून खासगी हॉस्टेलचे भाडे भरत आहोत. त्यामुळे शिक्षणाबरोबर राहण्याचा खर्च ही वाढला आहे.’’
सैनिक कल्याण विभागांतर्गत पुण्यात पर्वती आणि नवी पेठ येथे मिलिटरी वसतीगृह आहेत. यामध्ये माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा यांच्या मुलांना राहण्याची व जेवणाची सोय दिली जाते. कोरोनाकाळात बंद झालेले वसतिगृह अद्याप सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणी उद्भवत आहेत.

मी मूळची कोकणाची आहे, पुण्यात विधी अभ्यासक्रमात पदवीचे शिक्षण घेत आहे. कोरोनामुळे महाविद्यालये बंद होती, त्यामुळे घरीच होते. वसतिगृह बंद असल्यामुळे सुरक्षा, जेवण व राहण्याची समस्या, अतिरिक्त खर्च या कारणामुळे अद्याप पुण्यात आले नाही.’’
- रेखा सावंत (नाव बदलण्‍यात आले आहे) विद्यार्थिनी

कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने तसेच खबरदारीचा भाग म्हणून वसतिगृहे बंद केली होती. कोरोनाचा परिणाम महाविद्यालये शाळांच्या परीक्षांवरही झाला. वसतिगृहात प्रवेश देण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना वेळेत बोनाफाईड सर्टिफिकेट तसेच आवश्‍यक ती कागदपत्रे पुरविण्यात अडचणी येत आहेत. जुलैमध्ये झालेल्या प्रक्रियेत सुमारे २० विद्यार्थ्यांना देखील कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे संख्या अत्यंत कमी असल्यामुळे वसतिगृह सुरू करणे शक्य नाही. मात्र ऑगस्टमध्ये पुन्हा ही प्रक्रिया केली जाईल, तसेच विद्यार्थ्यांची संख्या किमान क्षमते इतकी असली तर नक्कीच वसतिगृहे सुरू करू.
- लेफ्टनंट कर्नल राजेंद्र जाधव (निवृत्त), सैनिक कल्याण विभाग पुणेचे प्रभारी संचालक

यांना मिळते वसतिगृहाची सुविधा
- माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी
- हुतात्मा जवानांच्या मुलांसाठी मोफत
- वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत वसतिगृहाची सुविधा
- मुलींना वयाच्या २५ वर्षाच्या पुढेही वसतिगृहात प्रवेश शक्य
- पण त्या अविवाहित असाव्यात तसेच नोकर नसावी

या कारणांमुळे वसतिगृहे बंद
- विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या नाही
- वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता नाही
- मनुष्यबळ कमी आहे
- अद्याप कित्येक विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत

येणाऱ्या अडचणी
- आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्यांना खर्च परवडेना
- मुलींना सुरक्षिततेचे अनेक प्रश्‍न उद्भवू लागले
- जेवणाची देखील समस्या असल्याचे अनेकांचे म्हणणे
- शिक्षणाचा आणि इतर खर्च वाढला

राज्यातील वसतिगृहांची संख्या ः ५०
सध्या सुरू असलेली ः ५
राज्यातील संपूर्ण वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जागा ः सुमारे ३ हजार

विभागनिहाय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्या ः
विभाग ः विद्यार्थ्यांची संख्या

पुणे ः १०७८
कोकण ः ४१६
नाशिक ः ४४५
नागपूर ः १४०
औरंगाबाद ः ४२५
अमरावती ः २७६

पुण्यातील स्थिती ः
वसतिगृह प्रकार ः वसतिगृहांची संख्या ः प्रवेश क्षमता
मुलांचे ः १ ः १७२
मुलींचे ः १ ः ९६

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी आकारले जाणारे शुल्क ः
पद ः शुल्क (प्रतिमाह रुपयांमध्ये)
हवलदार पदापर्यंत ः ९००
सुभेदार ः १२००
अधिकारी ः १५००

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84139 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..