
धारदार शस्त्राने वार करून नवी पेठेत तरुणाचा खून
पुणे, ता. २८ ः आखाड पार्टी साजरी करताना झालेल्या भांडणातून दोघांनी आपल्या मित्रावर धारदार शस्त्रांनी वार करुन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. ही घटना नवी पेठेतील गांजवेवाडी येथे घडली.
आनंद ऊर्फ बारक्या गणपत जोरी (वय ३२, रा. पर्वती दर्शन कॉलनी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सॅंडी नायर व बंडू थोरात असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी वैशाली गणपत जोरी (वय ३०) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद, सॅंडी व बंडू हे तिघेही एकमेकांचे मित्र आहेत. तिघेजण बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नवी पेठेतील पूना हॉस्पिटलजवळ असलेल्या गांजवेवाडी येथील सागर हॉटेलच्या मागील बाजूस आखाड पार्टी साजरी करण्यासाठी गेले होते. तेथे तिघांनी दारू पिऊन जेवण केले, त्यानंतर त्यांच्यात काही कारणामुळे वाद झाले. त्यानंतर संशयित आरोपींनी त्यांच्याकडील धारदार शस्त्राने आनंद याच्यावर वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, सहायक पोलिस आयुक्त रमाकांत माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविला. दरम्यान, आनंद याचा खून का केला, याचा अद्याप उलगडा झाला नाही.
----------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84198 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..