
विद्यार्थ्यांच्या अडचणींमुळे विशेष परीक्षांचे आयोजन
पुणे, ता. २८ : विद्यापीठाच्या आणि अन्य परीक्षा एकाच दिवशी येणारे, राष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या स्पर्धेसाठी निवड झालेले, तसेच राष्ट्रीय सेवा योजना किंवा समकक्ष स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झालेले आणि त्या स्पर्धा आणि परीक्षा एकाच दिवशी असणारे, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा विद्यापीठामार्फत घेण्यात येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाने ४ जुलै रोजी परिपत्रक काढून हे स्पष्ट केले आहे. परंतु, तरीही विद्यार्थी विविध मार्गाने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने पुन्हा एकदा या परिपत्रकाची आठवण करून दिली आहे. या परिपत्रकानुसार, परीक्षा एकाच दिवशी आल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करावे, याबाबत सूचनाही दिल्या आहेत. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा येत्या काळात घेण्यात येत आहेत. याच काळात अन्य अभ्यासक्रमाच्याही परीक्षा आहेत. त्यामुळेच ज्या दिवशी विद्यार्थ्यांच्या अन्य परीक्षा आहेत, अशा विद्यार्थ्यांनी सर्व पुराव्यांसह आपल्या महाविद्यालयाकडे अर्ज करावा, विद्यापीठ अशा विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेईल, असे जाहीर करत विद्यापीठाने दिलासा दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेत विशेष परीक्षेबाबत विद्यापीठाने ४ जुलै रोजी परिपत्रक जाहीर केले आहे. हे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याची माहिती न घेता विद्यार्थी वेळापत्रक बदलण्याची मागणी करत असतील तर ते योग्य नाही.
- डॉ. महेश काकडे,
संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84342 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..