
महापालिका निवडणूक : ओबीसींसाठी ४६ जागा राखीव आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण
पुणे, ता. २९ : आगामी महापालिका निवडणुकीतील सर्वच राजकीय चित्र बदलून टाकणारे ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी शुक्रवारी (ता. २९) बालगंधर्व रंगमंदिर येथे सोडत काढण्यात आली. २७ टक्क्यांनुसार १७३ पैकी ४६ ठिकाणी ओबीसी प्रवर्गासाठी जागा राखीव करण्यात आल्याने आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
यापूर्वी ओबीसी आरक्षण नसल्याने ३१ मे रोजी केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण काढण्यात आले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा सोडत काढून ओबीसींचे आरक्षण करण्यासाठीची प्रक्रिया राबविण्यात आली. अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गांच्या २४ जागा सोडून उर्वरित १४८ जागांचा या सोडतीमध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गांच्या जागांमध्येही बदल झाला आहे.
महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, उपायुक्त डॉ. यशवंत माने यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत काढण्यात आली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, १५ डिसेंबर २०२१ च्या राजपत्रातील तरतुदीनुसारही हे आरक्षण काढण्यात आले. हे आरक्षण काढण्यासाठी पारदर्शक ड्रम फिरवून महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून ओबीसी प्रवर्गांच्या ४६ जागा निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर यामधून २३ जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर उर्वरित १०२ जागांमधून ५१ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या.
शेवटची फेरी उत्कंठा वाढविणारी
सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण काढण्यासाठी शेवटची फेरी झाली. त्यामध्ये ‘अ’ जागेवर अनुसूचित जाती आणि ‘ब’ जागेवर ओबीसी आरक्षण पडलेल्या १२ प्रभागांपैकी ७ प्रभागांत ‘क’ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित काढण्यासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. हे आरक्षण काढताना सात प्रभागांत पुरुष उमेदवाराचा पत्ता कट होणार होता. यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधील अनिल टिंगरे, १९ मधील गणेश बिडकर, २० मधील अरविंद शिंदे, ३८ मधील आबा बागूल या उमेदवारांची अडचण होण्याची शक्यता होती. परंतु, हे प्रभाग सोडून इतर सात प्रभागांत आरक्षण गेल्याने त्यांची सुटका झाली. त्यामुळे ही फेरी उपस्थितांसाठी उत्कंठावर्धक ठरली. तर या फेरीमुळे प्रभाग क्रमांक ३ लोहगाव-विमाननगर, प्रभाग क्रमांक २१ कोरेगाव पार्क-मुंढवा, प्रभाग क्रमांक ३७ जनता वसाहत-दत्तवाडी, प्रभाग क्रमांक ३९ मार्केट यार्ड-महर्षीनगर, प्रभाग क्रमांक ४२ रामटेकडी-सय्यदनगर, प्रभाग क्रमांक ४६ महंमदवाडी-उरुळी देवाची, प्रभाग क्रमांक ४७ कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी या प्रभागांत सर्वसाधारण गटातील पुरुषांना संधी मिळणार नाही.
हरकती नोंदविण्यासाठी चार दिवस मुदत
ओबीसी आरक्षणाच्या प्रक्रियेवर हरकत नोंदविण्यासाठी ३० जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यान संधी असणार आहे. या हरकती आयुक्त कार्यालय, निवडणूक कार्यालय सावरकर भवन आणि १५ क्षेत्रीय कार्यालयांत नोंदविता येईल. ५ ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण राजपत्र प्रसिद्ध करण्यात येईल.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ओबीसी प्रवर्गाचे २७ टक्के आरक्षण निश्चित करण्यासाठी शुक्रवारी सोडत काढण्यात आली. यापुढील कार्यवाही निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार केली जाईल.
- विक्रमकुमार, आयुक्त, महापालिका
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84452 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..