
तरुणाकडून उकळली ६७ लाखांची खंडणी
पुणे, ता. २९ ः अनोळखी तरुणीने मैत्रीच्या जाळ्यात अडकवून साथीदारांच्या मदतीने एका तरुणाकडून तब्बल ६७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतरही पैशांसाठी तरुणीकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खंडणी उकळणाऱ्या तरुणीच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या.
चेतन रवींद्र हिंगमिरे (रा. काळेपडळ, हडपसर), निखिल ऊर्फ गौरव ज्ञानेश्वर म्हेत्रे (रा. गाडीतळ हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका तरुणीसह तिघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २६ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरुणाच्या चुलत भावाचे कोंढवा परिसरात खडी मशिनचा व्यवसाय आहे. तो चुलत भावाच्या कंपनीत पर्यवेक्षक म्हणून काम करत असल्याने त्याच्याकडे खडी मशिनचे सर्व आर्थिक व्यवहार आहेत. मागील वर्षी जानेवारी महिन्यात तरुण नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा परिसरात गेला होता. त्यावेळी तेथील एका लॉजवर तो मुक्कामासाठी थांबला होता. तेव्हा अनोळखी तरुणाने त्यास एका तरुणीचा मोबाईल क्रमांक देऊन तिला संपर्क साधण्यास सांगितले होते. त्यानंतर दोघांची ओळख होऊन गाठीभेटी वाढल्या. त्यानंतर त्याने तरुणीला वेळोवेळी आर्थिक मदत केली. तसेच दुचाकीसाठी २५ हजार रुपयेही दिले. दरम्यान, तरुणीने त्याच्याकडे सातत्याने पैशांसाठी तगादा लावला, तसेच ‘मी गर्भवती असून याबाबत पतीला माहिती देणार आहे’ असे सांगून तिने फिर्यादीस धमकाविण्यास सुरुवात केली. तरुणाने घाबरून हिंगमिरे यास पैसे दिले, तर निखिल म्हेत्रे याने तरुणाला वाघोली येथे बोलावून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडून वेळोवेळी ६७ लाख ७ हजार रुपये घेतले. या प्रकारास कंटाळून तरुणाने गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे तक्रार नोंदविली. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली. चेतन हिंगमिरे हा सराईत गुन्हेगार आहे.
---
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84719 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..