
खडकवासला : सर्वसाधारण प्रवर्गासाठी मोठी संधी
पुणे, ता. २९ः महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली १० गावे, बाहेरून आलेला व पुण्यात स्थायिक झालेला मतदार आणि भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची समान ताकद यामुळे खडकवासला मतदारसंघातील ३० जागा महत्त्वाच्या ठरणार आहेत. आरक्षणाचा विचार करता या मतदारसंघात अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण नसल्याने २० जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर ओबीसींसाठी १० जागा मिळाल्याने या प्रवर्गातील उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
भाजपचे भीमराव तापकीर खडकवासला मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा आमदार झाले, पण २०१९ चा त्यांचा निसटता विजय झाल्याने राष्ट्रवादीने आता महापालिकेसाठी कंबर कसली आहे. २०१२ च्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी १३ नगरसेवक होते. २०२२च्या प्रभागरचनेत थेट प्रभाग क्रमांक ३२, ३४, ३५, ३६, ५३, ५४, ५५, ५६ या ८ प्रभागांतील २४ जागा या मतदारसंघात आहेत, तर तीन प्रभाग हे पर्वती, कोथरूड मतदारसंघात असले तरी भौगोलिक विचार करता खडकवासला मतदारसंघाशी संलग्न असल्याने एकूण ३० जागा या मतदासंघाशी संबंधित असणार आहेत.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी खडकवासला, नऱ्हे, धायरी, किरकटवाडी, नांदोशी, कोंढवे धावडे, कोपरे, शिवणे, बावधन, सणसनगर ही १० गावे याच मतदारसंघातील आहे. या गावांचा समावेश प्रभाग ३४ वारजे-कोंढवे धावडे, प्रभाग ३५ रामनगर-उत्तमनगर, प्रभाग ३२ भुसारी कॉलनी-बावधन खुर्द, प्रभाग ५३ खडकवासला नऱ्हे, प्रभाग ५४ धायरी-आंबेगाव या पाच प्रभागांत असणार आहे. येथे राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप या तिघांनाही मानणारा वर्ग आहे. त्यामुळे याचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच खडकवासला मतदारसंघातील सर्व प्रभागांत अ जागा ओबीसी महिला किंवा ओबीसींसाठी राखीव आहे. तर ब आणि क जागा या सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण गटासाठी आहे. त्यामुळे ज्यांना ओबीसीमध्ये संधी मिळणार नाही असे इच्छुक सर्वसाधारण प्रभागासाठी फिल्डिंग लावली जाणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84728 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..