
पुणे : नशिबी कोंडी, उशीर अन् मनस्ताप!
सिंहगड रस्ता : कार्यालयीन कामकाज संपवून परतताना घरी लवकर कसे पोचू यासाठी प्रयत्न सुरू असतात. मात्र, जेमतेम एक ते दीड किलोमीटर रस्ता जाण्यासाठी तब्बल अर्धा ते पाऊण तास वेळ द्यावा लागतो. या सगळ्यात मनस्ताप तर होतोच, शिवाय इंधन आणि वेळ दोन्ही खर्च होत आहे. पर्यायी रस्ते सांगितले मात्र प्रत्यक्षात तेथेही वाहतूक कोंडी झालेली असते. त्यामुळे कुठूनही गेले तरी नशिबी वाहतूक कोंडी आहेच, अतिक्रमण ही काढले जात नाही. पुणे महापालिकेत सामान्य नागरिकांच्या वेळेला आणि जिवाला किंमत नाही अशी संतप्त भावना हिंगण्यातील भारती सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.
सिंहगड रस्त्याला उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ‘सकाळ’ने यावर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला सुधारणा करण्याचे आदेश दिले. त्यानंतरही या रस्त्यावरील अतिक्रमण, खड्डे, निसरडे रस्ते यातून सुटका झालेली नाही, त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.
काय करायचे होते, नेमके काय झाले?
- उड्डाणपुलाचे काम सुरू असताना दुकानांसमोरील, पादचारी मार्गावरील, रस्त्यावरील अतिक्रमण काढावे
- विरुद्ध दिशेने येणारे वाहनचालक, नो पार्किंगमध्ये गाड्या लावणाऱ्यांवर कारवाई करावी
- गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांवर बंदी घालावी
- सिमेंट रस्त्याला पडलेल्या भेगा बुजवून घ्याव्यात
- सायकल ट्रॅक काढून रस्ता मोठा करावा
- पण वरील उपाययोजनावर प्रशासनकडून कारवाई नाही
- मुख्य रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यासाठी केलेल्या सूचनांचीही अंमलबजावणी नाही
- वॉर्डनची संख्याही वाढलेली नाही
- सध्या दोन शिफ्टमध्ये १८ वॉर्डनकडून मुख्य रस्ता व पर्यायी रस्त्यावर वाहतूक नियमन
गतिरोधक काढला, जाळ्या ठेवल्या
माणिकबाग येथे पुष्पक मंगल कार्यालय येथील रस्ता अरुंद आहे. याठिकाणी बॅरिकेटींग करून पिलरचे काम सुरू आहे. वाहतुकीसाठी केवळ दीड लेन उपलब्ध आहे. या ठिकाणी गतिरोधकामुळे वाहतुकीचा वेग मंदावत असल्याने गतिरोधक काढून टाकण्यात आला, पण याठिकाणी दुकानांच्या समोर लोखंडी जाळ्या टाकून रस्त्यात अतिक्रमण केले आहे. येथे चारचाकी, दुचाकी लावून रस्ता अडवला जात आहे. पण हा भाग नो पार्किंग करण्याकडे महापालिका व वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत आहेत. तसेच या ठिकाणी १० दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते, पण हे काम निकृष्ट केल्याने खड्डे पडले आहेत, खडी रस्त्यावर पसरून रस्ता धोकादायक झाला आहे. याकडे प्रकल्प विभाग, सिंहगड क्षेत्रीय कार्यालय दुर्लक्ष करत आहे.
उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी मुख्य रस्ता चांगला करणे आवश्यक होते, तसेच पर्यायी रस्ते पूर्णपणे सुरू करणे गरजेचे होते. मात्र, महापालिकेकडून नियोजन न करता काम सुरू केल्याने त्याचा त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे.
- नितीन सातव, नागरिक
कामाचे नियोजन करून वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल आणि पुलाचे काम देखील लवकर कसे संपवता येईल याचे नियोजन महापालिकेने करणे आवश्यक आहे. सध्याचे नियोजन करताना नागरिकांचा विचार केला नाही.
- धनंजय मुळे, नागरिक
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पूर्वी १४ वॉर्डन होते, आता दोन शिफ्टमध्ये १८ वॉर्डन कार्यरत आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- अजय वायसे, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85079 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..