
लेहमध्ये अडकलेल्या पुण्याच्या पर्यटकांची सुटका
पुणे, ता. ३० ः खराब हवामानामुळे विमान रद्द होऊन २४ तासांपेक्षा जास्त वेळ लेहमध्ये अडकलेल्या पुण्याच्या १२ प्रवाशांची अखेर सुटका झाली. ते शनिवारी (ता. ३०) दुपारी विमानाने पुण्यात दाखल झाले. हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सूचनेनंतर इंडिगो विमानाने प्रवासी पुणे व मुंबई विमानतळावर उतरले.
पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांचा एक ग्रुप लेहमध्ये दाखल झाला होता. शुक्रवारी ते परतीचा प्रवास करणार होते. लेह ते दिल्ली व दिल्ली ते पुणे असा त्यांचा नियोजित विमान प्रवास होता. मात्र, शुक्रवारी लेहमधील वातावरण बिघडले. खराब वातावरणामुळे त्यांचे नियोजित विमान रद्द झाले. त्यानंतर प्रवाशांनी पुढच्या फ्लाइट बद्दल संबंधित विमान कंपनीस विचारले असता, कंपनीने त्यांना ३ ऑगस्टपर्यंत दिल्लीला जाणारे सर्व फ्लाइट बुक असल्याने तुम्हाला प्रवास करता येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे तुम्ही ३ ऑगस्टपर्यंत लेहमध्येच थांबावे, अशा सूचना केल्या. तेव्हा घाबरलेल्या प्रवाशांनी ट्विटरवर व्हिडिओ करून तो हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना टॅग केला. त्यानंतर शिंदे यांनी त्या व्हिडिओची दखल घेत विमान कंपन्यांना सूचना दिल्या. त्यानुसार लेह ते दिल्ली व दिल्ली ते पुणे असा प्रवास करून ते १२ प्रवासी पुण्यात दाखल झाले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85087 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..