Monkeypox : पुण्यातील संशयित १३ रुग्णांचे रिपोर्ट आले, वाचा काय म्हटलंय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monkeypox Virus News
मंकी पॉक्सच्या संशयित १३ रुग्णांचे नमूने ‘निगेटिव्ह’

Monkeypox : पुण्यातील संशयित १३ रुग्णांचे रिपोर्ट आले, वाचा काय म्हटलंय

पुणे : राज्यात मंकी पॉक्सची लक्षणे असलेल्या १३ संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी कोणालाही या आजाराचा संसर्ग झाला नसल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेतर्फे देण्यात आला आहे. देशात केरळपाठोपाठ दिल्लीमध्ये मंकी पॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यासाठी या संसर्गजन्य आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि साथरोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आतापर्यंत १३ संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी एकाही रुग्णाला मंकी पॉक्स झाल्याचे निदान झाले नसल्याची माहिती प्रयोगशाळेने आरोग्य खात्याला दिली. मंकी पॉक्सच्या संसर्गाचे निदान करण्याची सुविधा आता मुंबईमधील कस्तुरबा रुग्णालय आणि नागपूरमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे करण्यात आल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

काय आहे आजार?
मंकी पॉक्स हा विषाणूजन्य आजार आहे. जगात १९७० मध्ये कांगो येथे पहिला रुग्ण आढळला. ऑर्थोपॉक्स या ‘डीएनए’ प्रकारच्या विषाणूंमध्ये या आजाराचा संसर्ग होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो.

लक्षणे
- मंकी पॉक्सचा उद्रेक झालेल्या देशातून तीन आठवड्यांमध्ये प्रवास करून आलेल्या व्यक्तीच्या शरीरावर अचानक रॅश, पुरळ उठणे
- ताप, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा
- कानामागील, जांघेतील लसीका ग्रंथींना सूज येणे
- घसा खवखवणे, खोकला

मंकी पॉक्स या विषाणूजन्य आजाराची लक्षणे असलेल्या १३ रुग्णांचे नमुने आतापर्यंत प्रयोगशाळेने तपासले आहेत. त्यातून एकही रुग्ण आतापर्यंत राज्यात आढळलेला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्या बाबतचा टेहळणी राज्यभरात सुरू आहे.
- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85340 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..