माझा मीच राजा कामातून बायको वजा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझा मीच राजा
कामातून बायको वजा...
माझा मीच राजा कामातून बायको वजा...

माझा मीच राजा कामातून बायको वजा...

sakal_logo
By

माणसानं कसं एखाद्या राजासारखं वागावं. आपल्या मर्जीनं जगावं. उगाचंच कोणाला तरी घाबरून, त्याच्या ताटाखालचं मांजर होऊ नये, असं मला नेहमी वाटतं.
मी माझ्या आयुष्यात कधीच कोणाला घाबरलो नाही. बायकोला तर अजिबात नाही. तिच्याशी लग्न करायला जातानाही मी एखाद्या राजासारखा वागलो होतो.
रुबाबदार घोड्यावर बसून, विवाहस्थळी रपेट मारली होती. दिवसभर नवरदेव म्हणून मिरवत होतो. राजमुकूटासारखं बाशिंग बांधलं होतं. भरजरी राजवस्त्रासारखी सूटबूट घातला होता. त्यानंतर ‘आया है राजा, राजा के संग तुम झूम लो...’ हे गाणं वाजवत वऱ्हाडी मंडळींना मी बसलेल्या घोड्यासमोर नाचायला प्रवृत्त केलं होते. हा राजाचा रुबाब मी आजही टिकवून आहे. बायकोला ‘एक कप चहा दे’ अशी ऑ वर्डर अनेकदा राजाच्या थाटात देतो. तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं तरी डगमगत नाही. एखाद्या राजाच्या चालीसारखं किचनमध्ये जातो आणि स्वतःच्या हाताने चहा करून पितो. दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणीच काय पण चहादेखील पिऊ नये, या मताचा मी झालो आहे. सकाळचा चहा स्वतः बनवल्यानंतर तो कोठे प्यायचा, याचं स्वातंत्र्य मी अजून टिकवून आहे. चहा बेडवरच प्यायचा, की हॉलमध्ये प्यायचा की बाल्कनीत बसून घुटके घेत प्यायचा, हा निर्णय माझाच असतो. बायको त्यात अजिबात हस्तक्षेप करत नाही. कारण ती त्यावेळी जागीच नसते. माझे चहा-पाणी उरकल्यावर अर्ध्या तासाने मी तिला उठवतो व तिच्या हातात चहा देतो. तिचा चहा करतानाही चहात पावडर किती असावी, साखर किती असावी, दुधाचे प्रमाण किती असावे, कोणता कप असावा, बशी असावी की नसावी हे सगळे निर्णय माझे मीच घेतो. अनेक नवरे आपल्या बायकोला विचारून चहा-साखरेचे प्रमाण ठरवतात, हे अत्यंत चूक आहे.
लग्नानंतरही मी माझे स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे. अनेकजण आपले स्वातंत्र्य बायकोच्या दावणीला बांधतात. मी अजिबात तसं केलं नाही. माझ्या निर्णयात मी कोणालाही ढवळाढवळ करू देत नाही. अगदी बायकोलाही. उन्‍हाळ्याच्या दिवसांत मला थंड पाण्याने भांडी घासायचा मूड येतो. त्यावेळी मी थंड पाण्यानेच भांडी घासतो. हिवाळ्यात थंडी असल्याने पाणी गरम घेतो. याबाबत मी बायकोचा सल्लाच काय पण मदत घेण्याच्याही फंदात पडत नाही. भांडी घासतानाही कोणता साबण, वा लिक्विड वापरायचे याचं स्वातंत्र्य मला आहे. यात बायकोची लूडबूड अजिबात सहन करत नाही. बादलीत पावडरीचे पाणी घेऊन लादी पुसायची की मॉबने पुसायची यासाठी बायकोचा सल्ला घेण्याएवढा मी नंदीबैल नाही. लादी पुसताना बायको मध्ये आली, की त्याला चांगलं झापतो व मुकाट्याने एका जागी बसायला सांगतो. माझा वचकच तेवढा आहे. कपडे कोणत्या साबणाने धुवायचे, कोणत्या वॉशिंग पावडरीमध्ये भिजत ठेवायचे, वॉशिंग मशिनचा वेळ व वेग किती ठेवायचा, कपडे कोठे व कसे वाळत घालायचे, याचे निर्णयस्वातंत्र्य मला आहे. आपलं स्वातंत्र्य बायकोच्या चरणी गहाण ठेवू नये, या मताचा मी आहे. बायकोने केलेला स्वयंपाक मुकाट्याने खाणाऱ्यातील मी अजिबात नाही. मला माझ्या मर्जीने, मला जे आवडेल, ते खायला आवडतं. त्यामुळं स्वतःच्या हाताने मी स्वयंपाक बनवतो. कोणत्या भाज्या आणायच्या, याचं स्वातंत्र्यही मला आहे. आपल्या आवडीच्या भाज्या आपण नाही खायच्या तर कोणी खायच्या?
रात्री झोपण्यापूर्वी बायकोचं डोकं आधी चेपायचं की पाय याचा निर्णय मीच घेतो. तिने सांगितल्यानुसार वागायला मी काय तिचा नोकर आहे का? आपण आपल्या मनाचा राजा असलं पाहिजे. मी तर नक्कीच आहे. तुमचं तुम्ही ठरवा.

(‘मी ः स्वातंत्र्याचा उपासक’ यावर एका नवऱ्याने लिहिलेला निबंध)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85664 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..