परीक्षा पद्धतीत बदलाचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षा पद्धतीत बदलाचा निर्णय
परीक्षा पद्धतीत बदलाचा निर्णय

परीक्षा पद्धतीत बदलाचा निर्णय

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या पद्धतीमध्ये भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरतीप्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानात करावे लागणारे बदल व उपाययोजना, भविष्यामधील भरतीप्रक्रियेचे नियोजन आदींचा विचार करून एमपीएससीने परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा केल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या नवीन सुधारणा २०२३ पासून लागू केल्या जाणार असल्याचेही एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

गट-अ व गट-ब भरती
- राज्य सेवा परीक्षेसह सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील पदभरतीकरिता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार
- संवर्गानुसार पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर केला जाणार
- या पूर्व परीक्षेत राज्यसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषी सेवा या परीक्षांचा समावेश
- या परीक्षांची स्वतंत्र अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येणार
- परीक्षेत दिलेल्या संवर्गाकरीता (पदासाठी) उमेदवाराला पसंती देण्याचा पर्याय निवडता येणार
- मुख्य परीक्षेच्या निकालानंतर ऑप्टींग आउट ( भरती परीक्षेतून बाहेर पडण्याचा पर्याय) नंतर अंतिम निकाल जाहीर केला जाणार

गट ब व गट क भरती
- सर्व अराजपत्रित गट ब व गट - क संवर्गासाठी महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार
- महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना उमेदवाराला आवडीचे पद निवडता येणार
- मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरीता पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर केला जाणार
- महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट -क मुख्य परीक्षा या नावाने स्वतंत्र परीक्षा घेतली जाणार
- गट-ब आणि गट- क च्या अभ्यासक्रमानुसार स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार
- गट ब व क मुख्य परीक्षेसाठी पेपर १-मराठी व इंग्रजी तसेच पेपर २- सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी असे दोन पेपर द्यावे लागणार

हे लक्षात ठेवा...
पोलिस उपनिरीक्षक या पदाच्या निवडीसाठी शारीरिक चाचणी ७० गुणांची अर्हताकारी असणार आहे. यापूर्वी ६० गुणांची अर्हता होती. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग संवर्गाच्या विद्यमान भरतीप्रक्रियेमध्ये कोणताही बदल नाही. नवे बदल २०२३ पासून आयोजित परीक्षांपासून लागू होणार आहे. संबंधित परीक्षांची परीक्षा योजना, अर्ज स्वीकारण्याची पध्दत, अर्हता, वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, अभ्यासक्रम आदी बाबत सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.


बदल हा सर्व खरे शिकण्याचा अंतिम परिणाम
‘‘जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला. जग आपोआप बदलून जाईल,’’ असा एक प्रसिद्ध सुविचार आहे. प्रगतीसाठी बदलत राहणे गरजेचे आहे. अर्थात हे करताना सकारात्मक-नकारात्मक बाबींचा विचार होणेही आवश्‍यक आहे. ‘‘बदल हा सर्व खरे शिकण्याचा अंतिम परिणाम आहे,’’ असे दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील विशेष शिक्षण विभागात प्रोफेसर म्हणून काम केलेले व अमेरिकेतील प्रसिद्ध लेखक लिओ बस्काग्लिया यांनी म्हटले आहे. हे लक्षात घ्या. आणि ‘एमपीएससी’ने केलेल्या नव्या बदलांवर विद्यार्थी तसेच पालक म्हणून काय वाटते? यावर आपल्या प्रतिक्रिया नावासह
editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85681 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..