
आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सुरू
पुणे, ता. १ ः अखेर राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया जाहीर केली आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना आता मंगळवारपासून (ता. २) सुरुवात होणार आहे. याबाबतचा कालबद्ध कार्यक्रम सोमवारी (ता. १) जाहीर झाला.
या बदल्यांसाठी मंगळवारपासून जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांचे रोस्टर बिंदुनामावली ही बदल्यांसाठी खास विकसित केलेल्या ॲपवर अपलोड केले जाणार आहे. यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला आहे. सन २०१९ पर्यंत प्राथमिक शिक्षकांच्या दरवर्षी आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या होत असत. परंतु, मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि राज्यात लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे मागील दोन वर्षांपासून ही प्रक्रिया स्थगित झाली होती.
दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्याने शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द केले आणि नवीन धोरण निश्चित करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट स्थापन करण्यात आला. या अभ्यासगटाने केलेल्या शिफारशी स्वीकारत राज्य सरकारने शिक्षकांच्या बदल्यांचे नवे धोरण जाहीर केले आहे. या बदल्या आता नव्या धोरणानुसार केल्या जाणार आहेत. यासाठी या अभ्यासगटाने केलेल्या शिफारशीनुसार ऑनलाइन बदल्यांसाठी खास ॲप विकसित करण्यात आले आहे.
कोरोनामुळे २०१९ ते २०२१ या दोन वर्षांत एकाही शिक्षकांची बदली झाली नाही. शिवाय, यंदाही बदल्यांबाबतची संगणक प्रणाली पूर्णपणे विकसित न झाल्याने आतापर्यंत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊ शकली नव्हती. आता शाळा सुरू होऊन दीड महिना लोटल्याने यंदाही या बदल्या होणार की नाही? याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम आता दूर झाला आहे.
बदल्यांचा कालबद्ध कार्यक्रम
- बदल्यांच्या ॲपवर बिंदुनामावली अपलोड करणे ः २ व ३ ऑगस्ट
- बिंदूनामावली प्रसिद्ध करणे ः ४ ऑगस्ट
- बिंदुनामावली शिक्षकांसाठी अवलोकनार्थ ठेवणे ः ४ व ५ ऑगस्ट
- शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करणे ः ६ ते ९ ऑगस्ट
- आंतरजिल्हा बदलींची प्रत्यक्ष कार्यवाही ः १० ते १२ ऑगस्ट
- बदली आदेश देणे ः १३ ऑगस्ट
‘‘प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या नवीन बदली धोरणानुसार संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यानुसार सरकारने निश्चित केलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार ही बदली प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.’’
- आयुष प्रसाद, अध्यक्ष, शिक्षक बदली अभ्यासगट
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85755 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..