विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचे प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचे प्रयत्न
विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचे प्रयत्न

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचे प्रयत्न

sakal_logo
By

पुणे, ता. २ : रशिया-युक्रेन युद्धामुळे वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे पाठपुरावा करण्यात येत आहे. युक्रेनची राजधानी असणाऱ्या किव्ह येथील भारतीय दुतावासाकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, ट्रान्सस्क्रिप्ट उपलब्ध करून देण्यासंदर्भात संबंधित सर्व विद्यापीठांशी संवाद साधला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

डॉक्टर होण्याचे स्वप्नं उराशी बाळगून देशभरातील हजारो विद्यार्थी दरवर्षी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जातात. परंतु रशिया आणि युक्रेन यांच्यात फेब्रुवारी २०२२ पासून युद्ध सुरू झाले आणि त्याच्या झळा स्थानिक नागरिकांसमवेत वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही जाणवू लागल्या. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम राबविली. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल २० हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमधून मायदेशी परतले आहेत. परंतु, परदेशातील वैद्यकीय संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय वैद्यकीय संस्था, महाविद्यालये यामध्ये सामावून घेण्याची किंवा स्थलांतरित करण्याची कोणतीही तरतूद भारतीय वैद्यक परिषद अधिनियम १९५६ आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा २०१९ मध्ये नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना भारतीय वैद्यकीय विद्यापीठे, संस्थांमध्ये सामावून घेण्यास राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने परवानगी दिली नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.

भारतात एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ‘नीट’ परीक्षा देणे अनिवार्य असून या परीक्षेचा निकाल हा पात्रता प्रमाणपत्र मानण्यात येते, असेही त्यांनी एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमधील भारतीय दूतावासामार्फत तेथील संबंधित वैद्यकीय विद्यापीठे, महाविद्यालये यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांना ट्रान्सस्क्रिप्ट आणि अन्य डॉक्युमेंट उपलब्ध कसे होतील, हे पाहिले जात आहे. या संदर्भात सर्व माहिती दूतावासाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले आहे.

‘‘फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात युक्रेनमधून भारतात परतले. मात्र, टरनोपिल नॅशनल मेडिकल युनिर्व्हसिटीमार्फत ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. एकीकडे युद्ध सुरू असताना जूनमध्ये आमचे सत्र संपून ऑनलाइन परीक्षाही झाल्या. आता पुढील सत्र १५ ऑगस्टपासून सुरू होईल. परंतु ऑनलाइन वैद्यकीय शिक्षण राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला अमान्य आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत.’’
- श्रुती बोडके, युक्रेनमधून मायदेशी परतलेली विद्यार्थिनी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86078 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..