
अकरावीची पहिली गुणवत्ता यादी आज
पुणे, ता. २ ः अकरावी प्रवेशाच्या पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी (ता. ३) सकाळी दहा वाजता जाहीर होणार आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये अलॉट झालेले महाविद्यालय, तर महाविद्यालयांना अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती लॉगिनमध्ये दिसणार आहे. तसेच महाविद्यालयांचा ‘कट-ऑफ’ विद्यार्थ्यांना कळणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३१७ कनिष्ठ महाविद्यालयांमधील एक लाख ११ हजार ४३० जागांपैकी ८६ हजार ५८६ जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत होत आहे. दरम्यान, कोट्यांतर्गत २४ हजार ८४४ जागा उपलब्ध असून आतापर्यंत चार हजार ३५९ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. प्रवेशाच्या पहिल्या नियमित फेरीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी बुधवार (ता. ३) ते शनिवारपर्यंत (ता. ६) मुदत दिली आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी मिळालेल्या (अलॉट झालेल्या) महाविद्यालयास भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश फेरीअंतर्गत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास, त्यांनी विद्यार्थी लॉगिंनमध्ये जाऊन ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ वर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि संबंधित महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने सांगितले आहे.
शिक्षण संचालनालय म्हणते...
एखाद्या विद्यार्थ्याला मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल, तर ते पुढील फेरीसाठी थांबू शकतात. परंतु पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असल्यास तेथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाईल. तसेच एखाद्या विद्यार्थ्याला निश्चित केलेला प्रवेश रद्द करायचा असल्यास, त्यासाठी संबंधित महाविद्यालयास विनंती करून आपला प्रवेश रद्द करावा. असे प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित होतील आणि अशा विद्यार्थ्यांचाही त्यापुढील फेरीतच प्रवेशासाठी विचार करण्यात येईल, असेही शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86147 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..