
फुटबॉल स्टेडियमचे अखेर उद्घाटन
पुणे, ता. २ ः हडपसर येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल स्टेडियमचे उद्घाटन अखेर पुणे महापालिकेच्या नियमांना फाटा देऊन प्रोटोकॉल न पाळता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेकडून विद्युत व इतर सुविधाही कार्यक्रमासाठी पुरविण्यात आल्या. दरम्यान, महापालिकेच्या जागेतील उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे परस्पर नाव दिल्याने हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आली.
पुणे महापालिकेच्या निधीतून प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन करताना नगरसचिव विभागाकडून त्याची रीतसर प्रक्रिया पार पाडली जाते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण हे निश्चीत करून पत्रिका काढली जाते. पण सध्या महापालिकेत प्रशासक म्हणून आयुक्त काम पाहत आहेत. तर नगरसेवकांची मुदत संपल्याने त्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग नसतो. असे असताना माजी नगरसेवक व शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी त्यांच्या भागातील फुटबॉल स्टेडियमच्या कार्यक्रमाचे नियोजन परस्पर केले. याची माहिती महापालिका प्रशासनाला नव्हती.
असे असतानाही मंगळवारी सायंकाळी हडपसर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्टेडियमचे उद्घाटन केले. यावेळी पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाने या ठिकाणी विद्युत व्यवस्था पुरवली. तसेच भवन विभागातर्फेही सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, एका अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ‘‘हा कार्यक्रम परस्पर आयोजित केला आहे, हे खरे असले तरी मुख्यमंत्री येत असल्याने आम्हाला तिकडे जावे लागले. तेथे काही झाले असते तर परत आमच्यावरच सगळा दोष आला असता.’’ दरम्यान, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांच्याशी संपर्क होऊ शकाल नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86167 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..