
राजकारणात मला साथ द्या आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रेत साद
कात्रज, ता. २ : ‘‘राज्यात सध्या फक्त घाणेरडे राजकारण आणि खोटे बोलण्याचे काम सुरू आहे. राजकारणात चांगली लोकं टिकतात हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. म्हणून तुम्ही मला साथ द्या,’’ अशी भावनिक साद युवासेनाप्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना घातली. यावेळी जमलेल्या समुदायाने घोषणा देऊन ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.
कात्रज येथे आयोजित शिवसंवाद यात्रेत ठाकरे बोलत होते. विधान परिषद उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, शिवसेना नेते आदेश बांदेकर, आमदार सचिन आहिर, महादेव बाबर, संजय मोरे आदी या वेळी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र ही मावळ्यांची आणि संतांची भूमी आहे. आज काही गद्दार फिरत आहेत त्यांनी शिवसैनिकांचा यात्रेला प्रतिसाद पाहावा. या राज्यात गद्दारांना स्थान नाही. दोन लोकांचं मंत्रिमंडळ राज्यात अस्तित्वात असून त्यांचे हे सरकार बेकायदेशीर असल्याने लवकरच कोसळणार आहे. रक्ताचं पाणी करून यांच्यासाठी प्रचार केला आणि हे म्हणताहेत तुम्ही काय केलं? कदाचित यांच्यावर जास्त विश्वास ठेवला प्रेम दिलं हेच चुकलं. आम्ही उठाव केलाय, बंड केले नाही असे गद्दार म्हणत आहेत. पण, उठाव करायला मनगटात ताकद लागते. राज्याबाहेर पळून तुम्ही कसला उठाव केला. मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडताना लोकांच्या डोळ्यात पाणी आले, या राज्यातील जनता आमच्या सोबत आहे,’’ असेही ठाकरे यांनी सांगितले.
नागरिकांचा उत्साह
कात्रज येथील सभेत शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ठाकरे यांचे भाषण सुरू झाले तरी घोषणा थांबत नव्हत्या. त्यांच्या भाषणावर टाळ्या, शिट्या मारून, घोषणा देऊन नागरिकांनी प्रतिसाद दिला. परिसरातील इमारतींवरूनही नागरिकांनी सभा पाहण्यासाठी गर्दी केली होती.
ठाकरेंसाठी शिंदेनी केली वाट मोकळी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हडपसरची सभा संपल्यानंतर आमदार तानाजी सामंत यांच्या घरी जाण्यापूर्वी शंकर महाराज मठात दर्शनासाठी यावे, अशी विनंती मठातर्फे करण्यात आली होती. पण त्याचवेळी कात्रज येथील आदित्य यांची सभा संपली आणि तेही शंकर महाराज मठ येथे दर्शनाला आले. त्यामुळे ऐनवेळी मुख्यमंत्र्यांचे नियोजन बदलले व ते सावंत यांच्या घरी गेले. ठाकरे यांनी शंकर महाराज मठात दर्शन घेतल्यानंतर शिंदे दर्शनासाठी येऊन पुढे मार्गस्थ झाले. त्यामुळे ठाकरेंसाठी शिंदे यांनी वाट मोकळी करून दिल्याची चर्चा रंगली होती. मठाच्या पदाधिकाऱ्यांनीही यास दुजोरा दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86168 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..