
आरटीओची ६५ बाईक टॅक्सीवर कारवाई
पुणे, ता. ३ ः आरटीओचे निरीक्षक बनावट (डमी ) ग्राहक बनून बाईक टॅक्सीवर कारवाई करीत आहेत. ते स्वतः ग्राहक बनून मोबाईल ॲपवर बाईक टॅक्सी बुक करीत आहे. टॅक्सी चालक आल्यावर त्यांच्याच गाडीवर बसून ती गाडी थेट आरटीओ कार्यालयात आणून कारवाई केली जात आहे. पुणे आरटीओने यासाठी विशेष पथक तयार असून यात पाच निरीक्षकांचा समावेश आहे.
पुणे आरटीओ प्रशासनाने गेल्या काही दिवसांत बाईक टॅक्सीवरील कारवाई थांबवली होती. ती आता पुन्हा सुरु झाली. दोन दिवसांत आरटीओने ६५ बाईक टॅक्सीवर कारवाई करून त्या जप्त केल्या आहेत.यापूर्वी देखील आरटीओने मोठ्या प्रमाणात बाईक टॅक्सीवर कारवाई केली आहे. आता पुन्हा कारवाई सुरु झाल्याने बाईक टॅक्सी चालक धास्तावले आहेत. तर रिक्षा चालक सुखावले आहेत.
कशी होते कारवाई...
आरटीओने स्थापन केलेल्या पथकात एक मोटार वाहन निरीक्षक व ४ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आहेत. ते शहरांतील वेगवेगळ्या रस्त्यांवर थांबतात. साध्या वेशात असल्याने सामान्य ग्राहकाप्रमाणे टॅक्सी बुक करतात. आरटीओ कार्यालया जवळचे ठिकाण सांगून तिथे सोडायला सांगतात. चालक आल्यावर त्यांच्यासोबत गाडीवर बसून तिथे आल्यावर गाडी थेट आरटीओ कार्यलयाच्या आवारात आणून कारवाई केली जाते. मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करून गाडी जप्त केली जाते.
बाईक टॅक्सी विरोधात कारवाई सुरु असून दोन दिवसांत ६५ दुचाकी जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पुढे अशीच सुरु राहील. ग्राहकांनी देखील या सेवेपासून सतर्क राहणे गरजेचे आहे. - संजीव भोर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86222 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..