सिलिंडर संपला अन् नवरा ‘गॅस’वर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिलिंडर संपला
अन् नवरा ‘गॅस’वर!
सिलिंडर संपला अन् नवरा ‘गॅस’वर!

सिलिंडर संपला अन् नवरा ‘गॅस’वर!

sakal_logo
By

‘‘मला वाट्टेल ती कामं सांगत जाऊ नकोस. भाजीपालाच काय पण सिलिंडर आणणं हे माझं काम नाही. कसं आणायचं, तुझं तू ठरव.’’ योगेशने दीप्तीला सुनावले.
आज सकाळी दुसरा सिलिंडरही संपल्याचे दीप्तीच्या लक्षात आल्यावर तिने गॅस बुकिंगच्या आॅफिसमधून तातडीने सिलिंडर आणायला सांगितला. त्यावेळी चिडून योगेश बोलत होता.
‘‘तुझं सिलिंडरचं नियोजन चुकलंय. एक सिलिंडर संपल्यावर तू लगेचच दुसऱ्याचं बुकिंग का केलं नाहीस? तुझ्या चुका मी का निस्तरायच्या?’’ योगेशनने म्हटल्यावर दीप्ती शांत बसली. सकाळपासून नाश्‍ताच काय पण चहाही मिळाला नसल्याने त्याची चिडचिड वाढली होती.
‘‘बरं मी बघते सिलिंडरचं काय करायचं ते?’’ असे म्हणून दीप्ती घराबाहेर पडली. थोड्यावेळाने योगेशला मंजुळ आवाजात फोन आला.
‘‘योगेशराव बोलताय का? मी स्नेहल बोलतेय.’’ एखाद्या तरुणीने इतक्या गोड आवाजात ‘योगेशराव’ म्हटल्यावर योगेशचं मन मोरासारखं थुईथुई नाचू लागले.
‘‘अहो, मी गेल्या तीन महिन्यांपासून आपल्याच सोसायटीत ए विंगमध्ये राहते. माझी येथे कोणाशी फारशी ओळख नाही. मी तुम्हाला रोज सकाळी जॉगिंग करताना पाहते. तुम्ही काय मस्त बॉडी बनवली आहे हो.’’ स्नेहलने कौतुकाने म्हटले.
‘‘तुम्ही जिम जॉईन केली आहे का?’’ स्नेहलने विचारले.
‘‘आपल्या सोसायटी पलीकडेच साई जिम आहे. तिथं मी रोज दोन तास वर्कआऊट करतो.’’ योगेशने म्हटले.
‘‘तुम्ही किती वेटलिफ्टिंग करता?’’ स्नेहलने विचारले.
‘‘शंभर किलोचं तर मी सहज करतो.’’ योगेशने म्हटले.
‘‘तुमच्याशी ओळख करून घ्यावी, अशी माझी फार दिवसांपासूनची इच्छा आहे. माझा नवरा कामाला गेला की मला घर खायला उठतं. तुम्ही आता माझ्याकडे चहा- नाश्‍त्याला येऊ शकाल का?’’ स्नेहलने म्हटले. योगेशलाही कडाडून भूक लागली होती. त्यामुळं त्याने आमंत्रण स्वीकारलं.
‘‘माझं घर ए विंगमधील सहाव्या मजल्यावर आहे. मात्र, गेल्या दोन- तीन तासांपासून लिफ्ट बंद पडली आहे. त्यामुळे तुम्हाला सहा मजले चढून वर यावे लागेल. तुमची दमछाक होणार नाही ना?’’ स्नेहलने विचारले.
‘‘अजिबात नाही. उलट मी शंभर किलोचे ओझे घेऊन दणादण सहा मजले चढू शकतो.’’ योगेशने फुशारकी मारले.
‘‘अय्या खंरच ! घरी येताना तुम्ही माझं किरकोळ काम कराल का?’’ मधाळ स्वरात स्नेहलने विचारले.
‘‘एक काय हजार कामं सांगा.’’ योगेशने म्हटले.
‘‘अहो, घरातला सिलिंडर संपला आहे. त्यामुळे मी गॅस एजन्सीमधून सिलिंडर घेऊन आले आहे. मात्र, लिफ्ट बंद असल्याने मी तो वर आणू शकले नाही. त्यामुळे तो सिलिंडर सहा मजले चढून आणा ना प्लीजऽऽऽऽ.’’ स्नेहलने म्हटले. तिचं हे बोलणं ऐकून योगेश भांबावून गेला. मात्र, आता वेळ निघून गेली होती. नाईलाजाने तो ‘ए’ विंगमध्ये गेला. तळमजल्यावरील सिलिंडर उचलून त्याने तो खांद्यावर घेतला व ताडताड मजले चढत तो सहाव्या मजल्यावर आला. तिथं त्याने स्नेहलच्या घराची बेल दाबली. तेवढ्यात त्याच मजल्यावर दीप्ती तिची मैत्रीण प्राचीच्या घरातून सिलिंडर घेऊन बाहेर आली. खांद्यावर सिलिंडर व अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा या अवतारात योगेशला बघून तिला मोठा धक्का बसला.
‘‘कोणाची हमाली करताय?’’ असं तिने विचारायला आणि स्नेहलने दरवाजा उघडायला एकच गाठ पडली.
‘‘थेट किचनमध्ये सिलिंडर जाऊ द्या.’’ स्नेहलने योगेशला ऑर्डर दिली.
‘‘काय हो ! स्वतःच्या बायकोला ‘मला वाट्टेल ती कामं सांगू नकोस’ असं मघाशी म्हणालात आणि हे काय आहे?’’ दीप्तीने दातओठ खात म्हटले.
‘‘तुम्ही आधी घरी चला. तुमच्याकडे चांगलं बघतेच.’’ अशी धमकी दीप्तीने दिल्यावर योगेशच्या तोंडातून ‘ततपप’ शिवाय एक शब्द बाहेर पडू शकला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86459 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top