
परवान्याच्या प्रतीक्षेत ३० हजार वाहनधारक
पुणे, ता. ४ ः शहरातील सुमारे ३० हजार वाहनधारक वाहन परवान्याच्या प्रतीक्षेत आहेत. कारण, ‘आरटीओ’कडे वाहन परवाना (लायसन) देण्यासाठी आवश्यक असलेल्या स्मार्ट कार्डचा प्रचंड तुटवडा आहे. हैद्राबादमधील युटीएल कंपनीकडून काही तांत्रिक कारणांमुळे स्मार्ट कार्डाच्या पुरवठ्यात विस्कळितपणा आला आहे. त्याचा थेट फटका वाहन धारकांना बसत आहे. काही जणांना महिना लोटला तरी वाहन परवाना मिळालेला नाही.
पुणे आरटीओ कार्यालयातून रोज सुमारे दीड हजार लायसन्स दिले जातात. मात्र गेल्या काही दिवसांत स्मार्ट कार्डच्या पुरवठ्यात विस्कळितपणा आल्याने वाहन परवान्याच्या वितरणातही विस्कळितपणा आला आहे. टपाल कार्यालयाच्या कारभारामुळे तर कधी आरटीओच्या चुकीमुळे अनेकांना वाहन परवाना वेळेत मिळत नाही. आरटीओ कार्यालयात हेलपाटे मारून वाहनधारक बेजार होतात. आता तर कार्डच नाही तर परवाना छापणार कसा? यामुळेच वाहन परवानाच्या प्रतीक्षेत असलेल्या वाहनधारकांची संख्या वाढत आहे.
तीन दिवसांपूर्वी पुणे आरटीओ कार्यालयाला आठ हजार स्मार्टकार्ड मिळाले. मात्र, ती संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे आणखी दोन ते तीन दिवसांत हे कार्ड संपण्याची शक्यता आहे. याशिवाय, अनेक वाहन धारकांचे लायसन स्मार्ट कार्डवर प्रिंट करणे शिल्लक आहे. पुणे आरटीओ कार्यालयाला किमान ४० ते ५० हजार कार्डची गरज आहे.
आरटीओ व युटीएल कंपनीचा करार झाला. त्यानुसार कंपनीकडून कोऱ्या कार्डचा पुरवठा होतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो विस्कळित झाला आहे. आणखी कार्डची मागणी केली आहे. कार्डची उपलब्धता झाल्यास हा प्रश्न सुटेल.
- डॉ. अजित शिंदे,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86590 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..