पेठांत येताय; पीएमपी बस आहे का? प्रवाशांच्या समस्यांचे दुष्टचक्र संपेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMP-Bus
दुपारी पेठांत येताय; पण बस आहे का? प्रवाशांच्या समस्यांचे दुष्टचक्र संपेना

पेठांत येताय; पीएमपी बस आहे का? प्रवाशांच्या समस्यांचे दुष्टचक्र संपेना

पुणे - शिवाजी व बाजीराव रस्त्यावर येणाऱ्या चार मार्गांवरच्या मोठ्या बस पीएमपीने सुरू केल्या. मात्र तरीही प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. दुपारच्या सत्रात स्वारगेटहून बाजीराव रस्त्यावर येण्यास बस उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी रिक्षाचा पर्याय निवडला. रिक्षाचा प्रवास अनेकांना न परवडणारा आहे. दहा रुपयांत जाता येईल म्हणून अनेक प्रवाशांनी चाळीस मिनिटे वाट पाहिली मात्र, तरीही बस काही मिळाली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या समस्यांचे दुष्टचक्र थांबणार तरी कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पेठांमध्ये होणारी वाहतूक कोंडीचा विचार करता पीएमपीने १० मार्गांवरची मोठ्या बसने होणारी वाहतूक बंद करून त्या जागी ‘पुण्यदशम’ बसची सेवा सुरू केली होती. प्रवाशांचा वाढता विरोध व ‘सकाळ’ने विरोधात भूमिका मांडल्याने पीएमपी प्रशासनाने गुरुवारपासून चार मार्ग पूर्ववत केले. मात्र उर्वरित सहा मार्गांवरची मोठी बससेवा बंदच ठेवली. गुरुवारी सकाळी प्रवाशांना फारसा त्रास जाणवला नाही. तथापि, दुपारी फेऱ्यांमध्ये घट झाल्याने प्रवाशांना मंडई, तुळशीबाग, अप्पा बळवंत चौक, रविवार पेठ आदी भागांत येण्यासाठी बसच मिळाली नाही. तसेच दुपारी दोन ते अडीच या वेळात चालक-वाहकांच्या शिफ्टमध्ये बदल होत असते. यात वीस ते तीस मिनिटे प्रवाशांना थांबावे लागते. त्यामुळेदेखील प्रवासी वैतागले आहेत.

वेळापत्रक कोलमडले

पेठांमध्ये केवळ पुण्यातीलच नाही तर उपनगर, परगाव अन्य राज्यांतील नागरिकदेखील विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी येत असतात. प्रामुख्याने ते तुळशीबाग, मंडई, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा आदी परिसरात येत असतात. त्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी पीएमपी बसची पर्याप्त उपलब्धता असली पाहिजे. मात्र गेल्या काही दिवसांत पीएमपीचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. त्याचा फटका केवळ पुण्यातीलच नाही तर परगावच्या प्रवाशांनादेखील बसला आहे. परिणामी, रिक्षाला तीस ते चाळीस रुपये देऊन प्रवासी पेठांमध्ये येत आहे.

प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून त्या वेळेत अतिरिक्त बसची सोय केली आहे. दुपारच्या सत्रातदेखील बस आहेत. प्रवाशांची मागणी अधिक असेल तर अतिरिक्त बस सोडल्या जातील.

- दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86806 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punePassengerPMP Bus
go to top