खड्ड्यांप्रकरणी कार्यकारी अभियंत्यांना नोटिसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्ड्यांप्रकरणी कार्यकारी अभियंत्यांना नोटिसा
खड्ड्यांप्रकरणी कार्यकारी अभियंत्यांना नोटिसा

खड्ड्यांप्रकरणी कार्यकारी अभियंत्यांना नोटिसा

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः रस्त्यांना खड्डे पडल्याने काही ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर आता अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. दोष दायित्व कालावधीतील (डिफेक्ट लायबिलिटी पिरीयड-डीएलपी) रस्त्यांना खड्डे का पडले? याचा खुलासा करण्यासाठी सात कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्याचे आदेश पथ विभागप्रमुखांना दिले आहेत.

पहिल्याच पावसाळ्यामध्ये शहरातील रस्त्यांना खड्डे पडून चाळण झाली. त्यामुळे रस्त्यांच्या कामाच्या दर्जावर प्रश्‍न उपस्थित झाले होते. पावसाने उघडीप दिल्यानंतर खड्डे बुजविण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत सुमारे आठ हजार ५०० खड्डे बुजविले आहेत, तरीही शहरातील खड्डे कायम असल्याने हे काम सुरू आहे. महापालिकेच्या मुख्य पथ विभागातर्फे सात कार्यकारी अभियंत्यांच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती, नव्या रस्त्यांच्या निर्मितीचे काम केले जाते. एक रस्ता डांबरीकरण केल्यानंतर त्याचा डीएलपी तीन वर्षांचा असतो, तर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचा पाच वर्षांचा डीएलपी आहे.

पावसाळ्यात डांबरी रस्त्यांना खड्डे पडल्याने महापालिकेने ‘डीएलपी’तील रस्त्यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १३९ रस्त्यांची यादी सादर केली. या रस्त्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, ‘डीएलपी’तील रस्त्यांना खड्डे पडल्याने प्रति खड्डा पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत केवळ तीन ठेकेदारांना दंड करून पावणे चार लाख रुपये वसूल केले आहेत.

‘डीएलपी’तील रस्त्यांना खड्डे पडल्याने त्या भागाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सात कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांना दिले आहेत. अधिकाऱ्यांनी नोटिशीला दिलेले उत्तर अद्याप प्राप्त झाले नाही, असे खेमणार यांनी सांगितले.

क्षेत्रीय कार्यालयावर कारवाई होणार
मुख्य रस्त्यांपेक्षा गल्लीबोळातील रस्त्यांची दुरवस्था जास्त झाली आहे. त्याच्या हद्दीतील ‘डीएलपी’तील रस्‍त्यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले असून, १५ पैकी नऊ क्षेत्रीय कार्यालयांनी माहिती दिली आहे. उर्वरित सहा क्षेत्रीय कार्यालय माहिती सादर करण्यास टाळाटाळ करीत आहेत. शिवाय, क्षेत्रीय कार्यालयातील ‘डीएलपी’चे रस्ते खराब झाल्याने येथील अभियंत्यांनाही नोटीस बजावली जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86808 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..