
कैलाश सत्यार्थी : असंघटित क्षेत्राबाबत मांडली भूमिका बालकामगार कमी करण्याचे आव्हान
पुणे, ता. ४ : ‘‘असंघटित क्षेत्रातच बालकामगारांची संख्या सर्वाधिक आहे. संघटित क्षेत्रातही जिथे बालकामगार आहेत, ते क्षेत्र सोईस्करपणे असंघटित क्षेत्रात रूपांतरित केले जाते. स्वस्त मजूर असल्याने बालकामगारांचा सर्वाधिक वापर केला जात आहे. ही संख्या कमी करण्याचे आव्हान आहे,’’ असे मत नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केले.
सत्यार्थी पुण्यात आले असता ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही मते व्यक्त केली. ‘‘बालमजुरी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर कायदे तयार व्हावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. उत्पादन साखळीत बालकामगार हे सर्वांत खाली असतात. त्यांची संख्या कमी करायची असेल तर मुख्य उत्पादकाला त्यासाठी उत्तरदायी ठरवावे लागले. त्याचवेळी या कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांवरदेखील अंकुश ठेवायला हवा. या यंत्रणा दिलेल्या वेळेत आपली जबाबदारी ते पार पाडत आहेत अथवा नाही, यावरच या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी अवलंबून आहे. या एकत्रित प्रयत्नांनीच बालकामगारांची संख्या कमी करता येईल,’’ असे त्यांनी सांगितले.
आजही बालकांचे लैंगिक शोषण, गुलामी याबाबत आपल्याकडे अजूनही पुरेशी जागरूकता नाही. आपल्या राजकीय अजेंड्यापासून हे प्रश्न कोसो दूर आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘‘हळूहळू बदल होत आहेत, मात्र या बदलांची गती कमी आहे. ही गती वाढवण्यासाठी राजकीय, कायदेशीर, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व पातळ्यांवर प्रयत्न करायला हवेत,’’ असेही त्यांनी सांगितले.
नोबेल पुरस्काराचा झाला फायदा
‘‘मला नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अर्ध्या तासात बालकांच्या प्रश्नावर जेवढी चर्चा झाली, तेवढी गेल्या तीस वर्षांत झाली नव्हती, असे मी गमतीने म्हटले. कारण बालकांचे प्रश्न आपल्या समस्यांच्या अजेंड्यावर कधीच नव्हते. अनेकांना तर हे प्रश्न अजूनही अस्तित्वात आहेत, हे नव्यानेच कळले. अर्थात, यामुळे या प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधले गेले. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सहस्त्रक विकास उद्दिष्टांमध्ये मुलांच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला. अनेक जागतिक नेत्यांना भेटून त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधता आले. भारतातही जागरूकता वाढली. कायदे सक्षम झाले,’’ असेही त्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86826 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..