
खून प्रकरणात तिघांना जन्मठेपेची शिक्षा
पुणे, ता. ४ : पूर्वी झालेल्या भांडणातून १९ वर्षीय मुलाचा खून केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला.
महेश गणपत निठुरे, विशाल सुभाष कदम आणि जितेंद्र रावसाहेब बोरसे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. संकेत भीमा कोथिंबिरे (वय १९, रा. भोसरी) याचा १८ मे २०१२ रोजी भोसरीतील शांतिनगर भागात खून केला होता. या प्रकरणी संकेत याचे वडील भीमा दशरथ कोथिंबिरे यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. लांडेवाडी चौकात एकमेकांना खुन्नस देण्याच्या कारणावरून संकेत याचे तिघा आरोपींसमवेत भांडणे झाली होती. तिघांनी मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे मुलाने मला सांगितले होते. पूर्वी झालेल्या
भांडणाच्या कारणावरून आरोपींनीच माझ्या मुलावर धारदार हत्यारांनी वार करून जीवे ठार मारल्याचा संशय असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल केला होता. सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. खटल्याचे सुनावणी दरम्यान फिर्यादींचा मृत्यू झाला आहे. आरोपींनी प्रत्येकी ७५ हजार रुपये दंड म्हणून जमा करावेत. त्यातील दोन लाख रुपयांची रक्कम मुलाच्या आईला नुकसान भरपाई द्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86836 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..