
दरवाढ मंदावली : दोन महिन्यांत केवळ एकदाच महागले पेट्रोल-डिझेल वाहनचालकांना दिलासा
पुणे, ता. ५ : गेल्या अडीच वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे गाडीचा व्यवसाय करणे अवघड होऊन बसले आहे. डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या, मात्र तुलनेत गाडीचे दर फारसे वाढवता आले नाहीत. त्यामुळे नफा कमी झाला असून, गाडीचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न पडतो. मात्र गेल्या काही दिवसांत दर वाढत नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. या पुढील काळात दरवाढ न होता इंधनाच्या किमती कमी होण्याची अपेक्षा वाहनचालक किशोर शिंदे यांनी व्यक्त केली.
किशोर यांचे स्वतःचे चारचाकी वाहन आहे. ते भाडेतत्त्वावर देऊन त्यातून मिळणाऱ्या रकमेवर त्यांची उपजीविका चालते. कोरोनानंतर अनलॉक सुरू झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. मात्र या वर्षाच्या सुरुवातीपासून दरवाढ होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तर जून आणि जुलै या दोन महिन्यांत एकदाही दरवाढ झालेली नाही. तर चार ऑगस्ट रोजी पेट्रोल आठ तर डिझेल सात पैशांनी महागले आहे. त्यामुळे सध्या पुण्यात पेट्रोल १०५.९१, पॉवर पेट्रोल १११.५७ आणि डिझेल ९२.४३ रुपये प्रतिलिटर आहे.
इंधनाचे दर
१ जून
पेट्रोल - ११०.८७
पॉवर पेट्रोल - ११५.६३
डिझेल - ९५.३६
४ ऑगस्ट
- पेट्रोल - १०५.९१
- पॉवर पेट्रोल - १११.५७
- डिझेल - ९२.४३
१५ जुलैनंतर कमी झालेले दर
पेट्रोल - १०५.८३
पॉवर पेट्रोल - १११.४९
डिझेल - ९२.३६
१५ जुलैला कमी झालेल्या किमती
पेट्रोल - ५.०४
पॉवर पेट्रोल - ५.०५
डिझेल - ३
इंधन तयार करणाऱ्या कंपन्यांनी तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. त्यामुळे पुरेसे इंधन सध्या उपलब्ध होत आहे. तर गेल्या काही दिवसांत सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केले आहेत. त्यामुळे इंधनाचे दर कमी झाले आहेत. यापुढील काळातदेखील दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
- अली दारूवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन
दर कमी होण्याची कारणे
- आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी झाले
- इंधनाचा खप वाढविण्यात आला
- तेल तयार करणाऱ्या देशांनी दर कमी केले
- केंद्र आणि राज्य शासनाने कर कमी केला
गाडीचे हप्ते भरायचे आहेत म्हणून व्यवसाय करायचा. दिवसभर दररोज आठ ते दहा तास काम केल्यानंतर महिनाअखेर फक्त हप्ता भरण्यापुरते पैसे शिल्लक राहतात. कुटुंबाच्या आर्थिक गरजादेखील नीट भागवता येत नाही. इंधनाचे दर वाढले तर कंपनीने मात्र भाडे पुरेशा प्रमाणात वाढवले नाही. ते वाढवले तर ग्राहक तक्रार करतात. यामुळे आमची अडचण होते.
- ओलामध्ये व्यवसाय करणारे वाहनमालक
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87167 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..