
दिव्यांग व्यक्तींची माहिती जमा करणार
पुणे, ता. ६ ः जिल्ह्यातील एकही दिव्यांग व्यक्ती त्यांच्यासाठी असलेल्या हक्काच्या व्यक्तीगत लाभाच्या योजनांपासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची माहिती एकत्रित करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. यासाठी जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती शोध मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत गाव पातळीवरील आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरोघरी भेट देऊन दिव्यांग व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची माहिती जमा करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो. या लाभापासून एकही दिव्यांग व्यक्ती वंचित राहू नये आणि त्यांचे सरकारी योजनांच्या माध्यमातून जीवनमान उंचावले जावे, हा या मोहिमेचा खास उद्देश असल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी सांगितले.
कोरगंटीवार म्हणाले, ‘‘ही दिव्यांग शोध मोहीम येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील गावागावांतील प्रत्येक घराला भेट देऊन कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी केली जाईल. या तपासणीत दिव्यांग व्यक्तींचा शोध घेतला जाईल. ज्या सदस्यांची दिव्यांग म्हणून पूर्वी नोंद झाली असेल, अशा व्यक्तींकडील दिव्यांगाबाबतचे कागदपत्रे, प्रमाणपत्रांची नोंद स्वतंत्ररीत्या केली जाईल. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्यावतीने संयुक्तपणे ही शोध मोहीम घेतली आहे.’’
यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील दिव्यांग व्यक्ती योग्य प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रांअभावी विविध सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत. शिवाय, यामुळे आतापर्यंत केवळ कागदपत्रांअभावी वंचित राहिलेले सर्व दिव्यांग मुख्य प्रवाहात येतील. परिणामी, त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असेही कोरगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87268 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..