विद्यापीठासमोरील चौकाला कोंडीचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic jam in Opposite of Savitribai Phule Pune University front chowk
विद्यापीठासमोरील चौकाला कोंडीचा विळखा

विद्यापीठासमोरील चौकाला कोंडीचा विळखा

पुणे - महत्त्वाच्या कामानिमित्त शुक्रवारी सायंकाळी रिक्षातून निघालेला विनोद मोरे हा तरुण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकातील वाहतूक कोंडीमध्ये अडकला. एरवी ५ ते ७ मिनिटांत शिवाजीनगर गाठणाऱ्या तरुणास तब्बल एका तासापेक्षा जास्त वेळ कोंडीत अडकून पडावे लागले. त्यामुळे तरुण अक्षरशः त्रस्त झाला होता. हीच परिस्थिती गणेशखिंड रस्त्याने जाणाऱ्या हजारो वाहनचालक, नागरिकांची होती. वेगवेगळ्या कारणांमुळे शुक्रवारी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला.

गणेशखिंड रस्त्यावर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. मोदीबागेपासून ते विद्यापीठापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी हे काम सुरु आहे. त्यासाठी रस्त्याच्यामधोमध बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. परिणामी रस्ता अरुंद होऊन तेथून एक बस व अन्य छोटी वाहने अशी दोनच वाहने एकावेळी प्रवास करू शकतात. परिणामी वाहतूक कोंडी पाठीमागे वाढत जाऊन थेट बाणेर रस्ता, औंध येथील केंद्रीय विद्यालय, रेंजहिल्स कॉर्नर येथील भोसलेनगर परिसरात दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आता नेहमीचे झाले आहे.

शुक्रवारी सायंकाळी वाहतूक कोंडीचा विळखा
बालेवाडी, पिंपरी-चिंचवडहून येणारे वाहनांचे लोंढे, सेनापती बापट रस्त्याकडे वळण्यासाठी वाहनचालकांना झालेली घाई, बस, ट्रकसारख्या मोठ्या वाहनांची गर्दी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शुक्रवारी विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. विशेषतः गुरुवारी सायंकाळी खडकी, बोपोडीवरून रेंजहिल्समार्गे येणारी वाहने मोठ्या संख्येने कॉसमॉस बॅंकेसमोरील रस्त्यावरून सेनापती रस्त्याला जाण्यासाठी आली. अगोदरच बाणेर रस्ता व औंध रस्त्यावरून येणारी वाहने कॉसमॉस बॅंकेसमोर येऊन धडकत असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुरू होती. त्यातच रेंजहिल्समार्गे येणाऱ्या वाहनांची भर पडल्याने कोंडी वाढली. तेथून बस, जड वाहनांना वळसा घालून सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यास वेळ लागल्याने आणखीच कोंडी झाली. ई-स्क्वेअर ते खैरेवाडीपर्यंतच्या रस्त्यावर मेट्रोचे बॅरिकेडस्‌ वाढविण्यात आल्याने तेथेही जादा वाहने जाण्यास मर्यादा येऊ लागल्याने वाहतूक संथ होण्यास सुरुवात झाली. एरवी ५ ते ७ मिनिटांत शिवाजीनगरला पोचण्यासाठी वेळ लागत असताना गुरुवारी मात्र एका तासाहून अधिक काळ कोंडीमध्ये गेला.

पेट्रोल पंप ते शासकीय तंत्रनिकेतनपर्यंतही कोंडीच कोंडी
गणेशखिंड रस्त्यावरील मॉडेल कॉलनीकडे वळणाऱ्या रस्त्याजवळील पेट्रोल पंपापासून ते सूर्यमुखी दत्त मंदिर पुढे रेंजहिल्स कॉर्नर चौक ते विद्यापीठ चौकापर्यंत वाहतूक कोंडी कायम होती. अर्धा ते एका तासाहून अधिक काळ नागरिक वाहनांमध्ये अडकून पडले होते. दुचाकीचालक अंतर्गत रस्ते किंवा मिळेल तेथून पुढे जात होते, मात्र खासगी कार, रिक्षा, कॅब, बस अशा वाहनांमध्ये नागरिक अडकून पडले होते. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांचीही दमछाक झाली.

दररोज सायंकाळी विद्यापीठ रस्त्यावर वाहतूक कोंडी होती. मोजकेच पोलिस रस्त्यावर दिसतात. वॉर्डन चौकात असतात, पण वाहतूक कोंडी होणाऱ्या अरुंद रस्त्यावर कोणीच नसते. हे बदल लक्षात घेऊन जादा पोलिस ठेवले पाहिजेत.
- केदार वांजळे, वाहनचालक.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87269 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..